वडूज
(अजित जगताप) : दुष्काळी माण खटाव तालुक्यामध्ये विकास कामाचे ज्या ठिकाणी विनापरवाना फलक लावले जातात. त्याच वडूज बस स्थानक परिसरात अवकाळी पावसाने पाण्याचे डबके होण्याची परंपरा आजही कायम आहे. आमदाराचे मंत्री झाले तसे डबके सुद्धा मोठे झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
सातारा जिल्ह्यातील वजनदार आमदार आणि सध्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदार संघातील खटाव तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडूज बस स्थानकातून कराड, सातारा, कोरेगाव, फलटण व खटाव आणि माण तालुक्यात त्याचबरोबर पुणे- मुंबई- सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी वडूज बस स्थानकाचा वापर केला जातो. दिवसभरात किमान शंभर एस.टी. बस फेऱ्या होतात. तरीही या बस स्थानकाचे दुर्दैव आजही कायम आहे. फलाट वर प्रवाशांना थांबावे लागते तर बाहेर पावसाच्या पाण्याचे डबके साचल्यामुळे बाहेर गावच्या प्रवाशांना आपण आदिवासी भागात आल्याचा भास होतो.
प्रबळ विरोधक असल्यानंतर सत्ताधाऱ्यांना विकास कामे करताना लक्ष द्यावे लागते. वडूज नगरीची गोष्ट न्यारी आहे. ज्यांनी हुतात्मे देऊन स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. त्यांचा गौरव करणे आणि त्यातच समाधान मानणे. असा एक कलमी कार्यक्रम होत असल्याने पाण्याचे टक्के नव्हे तर मोठा खड्डा पडला तरी कोणी लक्ष देणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाल्याची टीका होऊ लागलेली आहे.
लोकप्रतिनिधींना जाब विचारावे असे मनापासून प्रवाशांना वाटते. पण बस स्थानकामधील भाग्यविधाते, विकास पुरुष, जय हो चा फलक आणि नारा बघून मुठभर का होईना विरोधकांना कोणी वाली नाही. हे स्पष्ट दिसून येत आहे. याला महत्वाचे कारण म्हणजे विकास कामासाठी भांडणारे व वेळेप्रसंगी जाब विचारणारे आणि जनतेसाठी झटणारे नेतृत्व लोप पावलेले आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वत्र अलीकडच्या काळात सत्ताधारी पक्ष हाच आमचा राजकीय पक्ष असे मानणारे कार्यकर्ते पक्ष प्रवेश करून सत्तेमध्ये आम्ही सामील आहोत .हे दाखवून देत आहे. त्यांच्या दृष्टीने कालही डबके होते आजही डबके आहे आणि उद्याही डबके राहिले तर नवल वाटणार नाही. पण, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे मात्र खरे. अजूनही पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने बस स्थानकातील डबक्याने आरसा दाखवला असून या आरशामध्ये आता प्रत्येकाने आपले चेहरे पाहावे. अशी मार्मिक प्रतिक्रिया वयोवृद्ध प्रवासी देऊ लागलेले आहेत.
_______________________
फोटो- वडूज बस स्थानक परिसरात पावसाच्या पाण्याच्या डबक्याने तयार झालेले चित्र (छाया– अजित जगताप, वडूज)