खोपोली (ता. खालापूर) – सातारा जिल्ह्यातील वासोटा परिसरातील तांबी गाव हे कोयना धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेले गाव असून, त्या गावाची कुलस्वामिनी श्री वाघजाई महाकाली देवीचे मंदिर खालापूर तालुक्यातील वडवळजवळ पुनर्वसित करण्यात आले आहे. या नव्याने बांधलेल्या मंदिराचा भव्य भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आठवण उपस्थितांसमोर मांडली. १९९५ साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे रमाधाम येथे सपत्नीक आले असता, त्यांनी श्री वाघजाई महाकाली देवीचे दर्शन घेतले होते, अशी आठवण त्यांनी सांगितली. या आठवणीने उपस्थित भाविकांच्या मनात एक विशेष भावनिक आणि ऐतिहासिक क्षण जागवला.
या प्रसंगी माजी सरपंच जितेंद्र सपकाळ, माजी आमदार सुरेश लाड, बावीस गाव मंडळाचे पदाधिकारी, तसेच खोपकर कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध धार्मिक विधी, भजन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला.