मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत शताब्दी नगरमध्ये उभ्या राहिलेल्या पुनर्वसन गृहांचा ताबा अद्याप रहिवाशांना मिळालेला नाही, याविरोधात रहिवाशांनी आज जोरदार आंदोलन छेडलं. गेल्या अनेक वर्षांपासून ही घरे पूर्णत्वास आली असूनही, अदानी समूह व प्रशासनाच्या हलगर्जीमुळे हक्कदारांना त्यांच्या हक्काचं घर मिळालेलं नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
रहिवाशांचे म्हणणे आहे की, त्यांनी अनेक वेळा DRP चे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे तक्रारी केल्या असून वैयक्तिक भेटीदेखील घेतल्या. मात्र प्रत्येकवेळी त्यांना नवी तारीख देऊन वेळ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही.
गेल्या आठवड्यात शताब्दी नगरमधील घरांवर नवीन नोटिसा चिकटवण्यात आल्या असून, रहिवाशांना पुन्हा एकदा अदानीच्या पात्रता सर्व्हेमध्ये सहभागी होण्यास सांगण्यात आलं आहे. यामागे मूळ रहिवाशांना घरांपासून दूर ठेवण्याचा कट असल्याचा आरोप शिष्टमंडळाने केला.
आज रहिवाशांचं शिष्टमंडळ DRP कार्यालयात श्रीनिवास यांची भेट घेण्यासाठी गेले असता, ‘ते मीटिंगसाठी गेले आहेत’ अशी माहिती देण्यात आली. हे सुद्धा एक टाळण्याचे कारण असल्याचा दावा रहिवाशांनी केला असून, जोपर्यंत श्रीनिवास त्यांना भेटत नाहीत तोपर्यंत ते कार्यालयातून न हलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
“आमच्या घरांसाठी, आमच्या हक्कांसाठी आम्ही आंदोलन करू!” असा जोरदार नारा देत शताब्दी नगरचे रहिवासी आपल्या अधिकारांसाठी लढण्यास सज्ज झाले आहेत.
प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
या मोर्चात खासदार वर्षाताई गायकवाड,आमदार डॉ ज्योतीताई गायकवाड,माजी नगरसेवक दीपक काळे, हज्जी बब्बू खान, शंकर संगम,राजू वाघमारे,शरीफ भाई, जियाउद्दीन शेख,
यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहा सविस्तर खालील लिंकवर :-