सातारा : साताऱ्यातून सध्या एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. सातारा जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे दिली असून, संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आज दुपारी ३:१५ वाजता कलेक्टर ऑफिस उडवणार असल्याचं मेलमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
विशेष म्हणजे ही मेल चेन्नईहून आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून, सातारा पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तत्काळ हालचालीत आल्या आहेत. संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, बॉम्ब स्कॉडने घटनास्थळी धाव घेतली आहे.
या घटनेला अधिक गंभीर बनवत आहे ती आज सकाळी ११:३० वाजता छत्रपती शिवाजी कॉलेज उडवून देण्याची मिळालेली धमकी. अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन ठिकाणी धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व दुचाकी आणि चारचाकी वाहनं तत्काळ हटवण्यात आली असून, संपूर्ण परिसरातील कर्मचार्यांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाच्या वातावरणातही बॉम्ब शोध पथकानं कलेक्टर ऑफिसच्या प्रत्येक कोपऱ्याची कसून झडती सुरू केली आहे. धमकी फसवी आहे का ? याचा तपास पोलिसांनी सुरु केला असून, ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी सायबर सेलदेखील सक्रिय झाला आहे.
सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात तणावाचं वातावरण आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आलं आहे.