महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब उपाध्ये यांच्या सूचनेवरुन माझे वडिल वसंतराव त्रिवेदी हे आई मनोरमा बरोबर 1956 साली अंबरनाथ येथे आले आणि त्यांनी अंबरनाथ येथे हरिजन सेवक संघाचे सुभाष बालवाडी आणि समाजविकास मनोरंजन केंद्र स्थापन केले. जरी समाजवादी विचारसरणी चे असले तरी घरात अध्यात्मिक, धार्मिक वातावरण होते. इतकेच नव्हे तर श्रीगुरुचरित्र पारायण, श्रीदत्त जयंती, श्रीगुरुपौर्णिमा हे उत्साहात आम्ही साजरे करीत असू. सुभाष वाडी (वांद्रापाडा) येथून साधारणपणे 1962 च्या सुमारास रवींद्र भवन येथे वास्तव्यास असतांना पुरुषोत्तम वासुदेव उर्फ भाऊसाहेब परांजपे यांना शिवमंदिर विभागातील श्रीदत्त मंदिरासाठी पुजारी हवा असल्याचे समजले. वसंतराव त्रिवेदी, जगदीश दामले, बाळकृष्ण भट्ट, काका पाटणकर, शांताराम वामन नाईक, डॉ. वि. भि. सरदार अशा मित्रमंडळींचा एक कंपू म्हणा, गट म्हणा पण एक चांगला समूह होता. त्यामुळे एकमेकांना भेटणे, चर्चा होणे हे ओघाने आलेच. त्यामुळे या गप्पांच्या वेळी शिवमंदिर विभागातील श्रीदत्त मंदिराचा विषय निघाला. भाऊसाहेब परांजपे यांना शांताराम नाईक उर्फ नाईक मास्तर यांनी वसंतराव त्रिवेदी यांचे नांव सुचविले. कोण ? वसंतराव त्रिवेदी ? अरे तो तर पक्का समाजवादी. तो काय माझे दत्त मंदिर सांभळणार ! असे म्हणत थट्टा केली. पण नाईक मास्तर यांनी, “अहो भाऊसाहेब, तो जरी समाजवादी असला तरी श्रीगुरुचरित्राचा एक अध्याय वाचल्याशिवाय तो घराबाहेर पडत नाही”, असे समजावून सांगितले. तेंव्हा आम्ही 1969 साली भाऊसाहेब परांजपे चाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी रहायला आलो. भाऊसाहेब, नाईक मास्तर यांची धरमसी मोरारजी केमिकल कंपनी मधली मैत्री. याच धरमसी मोरारजी केमिकल कंपनी मध्ये काटा मास्टर होते कृष्णाजी विश्वनाथ केतकर. हे ही भाऊसाहेब. भाऊसाहेब केतकर हे परांजपे चाळीत एका छोट्याशा खोलीत रहात. पण त्यांचेही दत्त मंदिर आहे. ते अध्यात्ममार्गी पथिक. त्यांचा परिवार मनोरमाबाई केतकर, प्रकाश, सुहास, शैला आणि देवयानी हे वसई तालुक्यात आगाशीला रहात असे. आम्ही आणि केतकर यांचा 1969 साली जो परिचय झाला तो म्हणजे आम्ही जणू एकाच कुटुंबातील झालो. भाऊसाहेब केतकर हे अध्यात्ममार्गी असल्याने दर गुरुवारी त्यांच्याकडे भाविकांची गर्दी असे. मग पुरुषोत्तम सखाराम उर्फ तात्या कानेटकर, दादासाहेब रेगे ही गोरेगांव येथील मंडळी दर गुरुवारी अंबरनाथ येथे येत. हां हां म्हणता भाऊसाहेब केतकर हे केतकर महाराज आणि त्यातून ते प्रसाद महाराज म्हणून ओळखण्यात येऊ लागले. आमची दोन खोल्यांची जागा आम्ही भाऊसाहेब केतकर यांना दिली आणि आम्ही व आमचा छापखाना बाजूच्या जागेत हलविला. कारण एकाच खोलीत भाऊसाहेबांनी सकाळी अकरा वाजता केलेला स्वयंपाक चक्क संध्याकाळी खायला मिळत असे. एवढी गर्दी. त्यांनी त्यांची राहती खोली दत्त मंदिर म्हणून उपयोगात आणली. आम्ही ज्या कारणासाठी परांजपे चाळीत रहायला गेलो ते दत्त मंदिर वर्ष दीड वर्षात फडणीसांच्या हवाली गेले. पण आम्ही परांजपे आणि नंतर नाईक चाळीतले रहिवासी झालो. भाऊसाहेब केतकर यांच्या परिवारात आम्ही पण मिसळून गेलो. त्यामुळे त्यांच्या कडे येणारा प्रत्येक जण आमचा झाला. कौटुंबिक सदस्य झाला. मी वडिलांबरोबर नेहमी कामानिमित्त मुंबईत जात असे. असाच एकदा महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ या मुंबईतील कार्यालयात वडिलांबरोबर गेलो. तिथे त्यावेळी भाऊसाहेब नेवाळकर हे अध्यक्ष होते आणि त्यांचे सचिव होते रामचंद्र जोग. पण स्वागत कक्षात रिसेप्शनिस्ट म्हणून एक गोरी आणि घाऱ्या डोळ्याची स्त्री बसली होती. वडिलांनी माझी ओळख करुन दिली, ही भाऊसाहेबांची शशी. म्हणजे भाऊसाहेब केतकर यांची मोठी मुलगी सुजाता जोग. भाऊसाहेब नेवाळकर यांच्या सचिव रामचंद्र जोग यांच्या सुविद्य पत्नी. आमचे वरचेवर त्या कार्यालयात येणे जाणे होत असे. मी हळूहळू मुंबईच्या वर्तमानपत्र दुनियेत आलो. दैनिक नवशक्ति, दैनिक मुंबई सकाळ आणि दैनिक सामना करता टप्याटप्याने पत्रकार म्हणून काम करीत होतो. आणि एक दिवस चक्क सुजाता जोग सामना मध्ये आल्या. चुणचुणीत आणि अत्यंत उत्साही अशा या सुजाता जोग मग माझ्या सहकारी झाल्या. त्यांचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभुत्व असल्याने त्यांच्या कडे उत्सव, फुलोरा या पुरवण्यांची जबाबदारी आली. माझे लेख त्यांच्या पुरवणीत येऊ लागले. एक लेख मात्र वरिष्ठांच्या सूचनेवरुन पानावर लागलेला काढून टाकावा लागला. तेंव्हा त्या हळहळल्या. मला काहीही वाटले नव्हते. अर्थात मला अशा गोष्टींची सवय झाली होती. शशी म्हणजे सुजाता जोग ही माझी मोठी बहिण मला मिळाली. अर्थात भाऊसाहेब केतकर यांच्या आणि सुजाता जोग यांचा स्वभाव मिळताजुळता. पक्क्या अभिमानी. सुरुवातीला तर त्या भाऊसाहेब केतकर हे माझे पिताश्री खरे पण म्हणून मी त्यांना महाराज वगैरे म्हणणार नाही. मी नेहमी त्यांना म्हणतो की अहो, भाऊसाहेब तुमचज वडिल असले तरी आम्हीच जास्त त्यांच्याजवळ राहिलो आहोत. त्यासुद्धा ते मान्य करतात. सुजाता जोग विलेपार्ले इथे रहायला. त्यामुळे त्यांचा साहित्य, नाट्य, चित्रपट या कलाक्षेत्राशी निकटचा संबंध. कॉस्मोपोलिटन, बहुभाषिक, बहुविध अशा मुंबापुरी मध्ये गिरगांव, परळ-लालबाग, दादर, विलेपार्ले, बोरीवली, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ बदलापूर, ठाणे मुलुंड ही खऱ्या अर्थाने मराठमोळी वस्ती. साधारणपणे मराठी पत्रकारिता करतांना सुजाता जोग यांनी सकाळ, सामना या वृत्तपत्रांबरोबरच विविध प्रकारच्या दिवाळी अंकांसाठीही विपुल लिखाण केले आहे. करीत आहेत. सामना मध्ये कार्यरत असतांना इंद्रायणी सावकार, रवींद्र खोत, संजय डहाळे, अतुल जोशी यांच्या समवेत जोगबाईंची चांगली गट्टी जमली. मी 15 डिसेंबर 1988 रोजी सामना मध्ये पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली आणि बाळासाहेब ठाकरे यांनी निवडलेला 19 ऑक्टोबर 2013 रोजी सेवानिवृत्त झालेला पहिला असलो तरी सामना सुरु झाल्यानंतर नोकरी सोडून गेलेल्यांपेक्षा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पहिल्या महिला पत्रकार म्हणजे सुजाता जोग. मी सेवानिवृत्त झालो, माझ्या नंतर संजय डहाळे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झालेल्या मंडळींनी नंतर आपला दबदबा अन्य क्षेत्रात निर्माण केला. आमचे परममित्र अनिल जोशी यांनी आपला वार्ताहर मध्ये ते सहसंपादक असतांना अनेकांना लिहिते केले. मग त्यात विजय वैद्य, रेखाताई बोऱ्हाडे, प्रा. सौ. नयना रेगे यांच्या बरोबरच सुजाता जोगही तिथे लिहू लागल्या. वडाळा, दादर येथे दिल्ली प्रेस या ‘गृहशोभा’, ‘गृहशोभिका’, ‘सरस सलील’ या प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांच्या कार्यालयात सौ. स्नेहल प्रकाश सावंत यांच्या समवेत ही सुजाता जोग यांनी काम केले. पँरामिन पब्लिसिटी या जाहिरात संस्थेतही आपला ठसा उमटविला. कादंबरी लिहिणे हा तर सुजाता जोग यांचा आवडीचा विषय. ‘तो आला, तो जिंकला’ ही कादंबरी त्यांनी लिहून हातावेगळी केली. विशेष म्हणजे या कादंबरीचे प्रकाशन त्यांनी अंबरनाथ येथे प्रसाद महाराज यांच्या प्रसादाश्रमातील प्रसाद महाराजांच्या भव्य प्रतिमेसमोर आहुति संपादक गिरीश वसंत त्रिवेदी आणि कार्यकारी संपादक सौ. मनीषा गिरीश त्रिवेदी यांच्या उपस्थितीत केले. एक कादंबरी प्रकाशित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पण त्यांची फसवणूक झाली. दोन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित तिसरी कादंबरी प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 29 जानेवारी 2019 रोजी पती रामचंद्र जोग यांचे वयाच्या 84 व्या वर्षी देहावसान झाले.अत्यंत मितभाषी आणि प्रामाणिक अधिकारी अशी रामचंद्र जोग यांची ख्याती होती. सुपूत्र सत्यजित, सूनबाई सोनाली आणि लाडका नातू तेज हे कांदिवली येथे राहतात. पण सुजाता जोग यांनी विलेपार्ले येथेच राहणे पसंत केले. पतीच्या क्रियाकर्माची संपूर्ण जबाबदारी ज्ञानप्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून पार पाडली. आपले साहित्य, कला या संदर्भातील छंद स्वतंत्रपणे जोपासतांना अत्यंत उत्साहात त्यांची अभिनयकला बहराला आली नसती तरच नवल. विविध प्रकारच्या, विविध भाषेतील सुमारे 20 पेक्षा जास्त जाहिरातींमधून त्यांनी काम केले आहे. अडुळसाची गाजलेली जाहिरात त्यापैकीच एक. अर्बन लेडर फर्निचर, लॉईड एअर कंडिशन्ड, डालडा मस्टर्ड ऑईल, नेस्ले (श्रीलंका), नोवार्टीज अशा अनेक आहेत. सलमान खान आणि करीना कपूर यांच्या बजरंगी भाईजान मध्ये करीनाची आजी सुजाता जोग यांनी साकारली आहे. बत्ती गुल, मीटर चालू, अग्ली, गोरी तेरे प्यारमें, इत्तेफाक या चित्रपटांतून त्यांनी आपली अभिनय कला साकारली आहे. तर सीआयडी, शपथ, लाल इष्क, मन में हैं विश्वास, पोलीस फाईल या मालिका आणि बॉम्बे बेगम्स, सबका सांई या वेबसिरीज मध्ये ही त्यांनी काम केले आहे. विलेपार्ले येथील लोकमान्य साहित्य संघ, आम्ही पार्लेकर अशा विविध संस्थांशीही त्या निगडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विलेपार्ले येथे संस्थेला भेट दिली तेंव्हा ही माझी संस्था आहे, असे त्या अभिमानाने सांगायला विसरल्या नाहीत. विविध विषयांवर लिखाण करण्यात त्यांनी सातत्य ठेवले असून श्रमिक एकजूट, वृत्तमानस, महासागर, नवराष्ट्र, बित्तंबातमी, हिंदुस्थान, जनादेश, जनमत या वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रसिद्ध होतात. आहुति आणि त्रिवेदी परिवार हा आपलाच असल्याने आहुति मध्ये सातत्याने लेख प्रसिद्ध होतात. राजकीय विषय बाजूला ठेवून सामाजिक विषयांवर त्यांचा भर असतो. चांगली घटना घडली की मग बोरीवली येथे चला आपण गिरगांव कट्टा येथे सहभोजन करु या, मुकेश, वैद्य, नयना, रेखा यांना बोलवा, माया, देवांशी, प्रशांत आणि वेद ला नक्की घेऊन या, असं त्या आवर्जून सांगतात. मला ज्या वर्षी साठ वर्षे पूर्ण झाली तेंव्हा गिरीश आणि सुजाता जोग, रेखाताई बोऱ्हाडे, अजित म्हात्रे, श्रीकांत खाडे, संजय डहाळे यांनी माझ्या अपरोक्ष माझ्या अभीष्टचिंतनाचा अचानक कार्यक्रम माझ्या घरीच घडवून आणला. सुजाता जोग यांनी माझे औक्षण केले. आहुति चा खास अंक काढून गिरीश ने मला व माझ्या परिवाराला आश्चर्य व आनंदाचा धक्का दिला होता. इंद्रायणी सावकार यांच्या बरोबर त्यांचे वरचेवर बोलणे सुरु असते. मुंबईहून इंद्रायणी सावकार या बंगळुरुला गेल्या असल्या तरी संपर्कात खंड पडला नाही. आपल्या आयुष्यात सुजाता जोग यांनी पहिल्यांदा मला नारळी पौर्णिमेला राखी बांधून भावा बहिणींच्या नात्याची रेशीमगाठ पक्की केली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. मुंबई मराठी साहित्य संघ, पार्ले टिळक, लोकमान्य सेवा संघ येथे फेरफटका मारायला त्या विसरत नाहीत. कोरोनाच्या वातावरणात मात्र त्यांचे वर्क फ्रॉम होम खऱ्या अर्थाने सुरु होते. ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर, विजय वैद्य, प्रकाश परांजपे, शिवाजी धुरी, संतोष भिंगार्डे, विलास मुकादम, विलास पाटील मंत्रालयातील अधिकारी वर्षा आंधळे आदींसमवेत याही काळात त्या संपर्क ठेवून आहेत. शशीकला सरदार, शशीकला रेवणकर, शशी गाडगीळ आणि शशी जोग हा शशींचा समूह आमच्या परिवाराचा अविभाज्य घटक आहे. भाऊसाहेब केतकर उर्फ प्रसाद महाराज यांच्या परिवारातील सर्वात मोठी शशी म्हणजे सुजाता जोग अतीशय परखड, पटेल तेच बोलणार, भाऊसाहेबांसारखाच स्वभाव, उत्साहाचा जणू खळखळणारा धबधबाच. त्यांची भावंडे प्रकाश, सुहास, शैला, देवयानी या आपापल्या परिवारात व्यस्त आहेत. शैला बडोद्याला असते. मामा अनंतशास्त्री दातार, सोनूआत्या पाटणकर, मालाडला मंगू आत्या, बाळ बर्वे, विद्या, प्रतिभा या आतेभगिनी, अतुल आतेभाऊ,बायडू आत्या, बाळू/प्रमोद शिंत्रे अशा सर्वच कुटुंबीजनांना सुजाता जोग यांनी आपल्या स्वभावाने सांभाळून एकत्र ठेवले आहे. या सर्वांना सुद्धा सुजाता उर्फ शशीचे कौतुक आहे. ‘आमची आगाशी, आमचे महाविष्णू मंदिर,’ असे म्हणतांना सुजाता जोग यांचा अभिमान ओतप्रोत भरलेला/भारलेला दिसून येतो. मग चाळपेठ, आगाशीच्या आठवणीत तासनतास सहज निघून जातात. वाडिवकर गुरुजींपासून तर बाळू शिंत्र्यांपर्यंत जुन्या आठवणी समोर येतात. भाऊसाहेब केतकर यांचे गुरु धुळे येथील सद्गुरु बापूजी भंडारी यांच्या देवस्थान ट्रस्ट बरोबर सुजाता जोग या जोडल्या गेल्या आहेत त्याच प्रमाणे गोंदवलेकर महाराज यांचा अनुग्रह सुद्धा त्यांनी घेतला आहे. अशा या 20 मे 1946 रोजी जन्मलेल्या रिसेप्शनिस्ट, आध्यात्मिक, साहित्यिक, अभिनेत्री आणि ज्येष्ठ पत्रकार त्याचप्रमाणे एक आदर्श माता, आदर्श गृहिणी सुजाता जोग यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, त्यांच्या हातून जास्तीत जास्त साहित्य शारदेची सेवा घडो ही कुलदेवतेकडे विनम्र प्रार्थना
-योगेश वसंत त्रिवेदी, 9892935321.(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)