प्रतिनिधी : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम व महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दि. 16 मे 2025 रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिवस’ साजरा करण्यात आला. सन 2025 च्या ‘राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे’ घोषवाक्य ‘Check, clean, cover : steps to defeat Dengue’ अर्थात – ‘तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा : डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा’ असे जाहीर करण्यात आले आहे. त्यास अनुसरून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
जनतेमध्ये डेंग्यूविषयी जागरूकता निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग करुन घेण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो. या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहचविण्यात येते.
यावर्षी देखील दि. 16 मे 2025 रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत विविध ठिकाणी शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते. या सदर शिबीरांमध्ये नागरिकांना ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून तसेच घराभोवती व घरांतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने दाखवून जनजागृती करण्यात आली.
डेंग्यू आजारावर मात करावयाची असेल तर महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांसोबतच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्वाचे आहे ही बाब समजून सांगण्यात आली. या शिबिरांठिकाणी 7455 नागरिकांनी भेट दिली असून, 844 रक्तनमुने घेण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त दि. 16 मे ते 21 मे 2025 या कालावधीमध्ये वैद्यकिय अधिकाऱ्यांमार्फत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील सर्व कर्मचारी व फवारणी कामगारांची सभा घेण्यात आली तसेच नमुंमपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी वैद्यकिय व्यावसायिक यांची सभा घेण्यात येणार आहे.
त्यासोबतच जनजागृतीच्या दृष्टीने 16 ते 24 मे 2025 या कालावधीत सायं. 6 ते 8 या वेळेत गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टी भागात, चौकात, बाजारपेठेच्या आवारात अशा विविध जागी 31 जनजागृतीपर पथनाट्ये सादरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. याव्दारे –
v डेंग्यु आजाराची कारणे –
· डेंग्यू हे किटकजन्य आजार आहे.
· डेंग्यू आजार पसरविणारी एडिस एजिप्ताय डासाची मादी स्वच्छ पाण्यामध्ये अंडी घालते.
· एडिस एजिप्ताय डासाची मादी दिवसा चावते.
· डेंग्यू आजार विषाणू संक्रमित एडिस एजिप्ताय या डासाच्या मादीच्या चावण्यामुळे प्रसार होतो.
v आजाराची लक्षणे –
· एकाएकी तीव्र ताप येणे.
· तीव्र डोकेदुखी स्नायु दुखी, सांधे दुखी व उलट्या होणे.
· दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी.
· तोंडाला कोरड पडणे.
· ताप कमी जास्त होणे.
· अंगावर पुरळ येणे.
v डासउत्पत्ती स्थाने –
· घरातील व घराबाहेरील झाडांच्या कुंड्यांच्या खालील प्लेटमधील पाणी, झाकण नसलेली पाणी साठविण्याची भांडी, फेंगशुई मध्ये साचलेले पाणी इत्यादी.
· गॅलेरीत / गच्चीवरील, घराच्या परिसरात भंगार साहित्य, रिकाम्या बाटल्या, करवंट्या, रंगाचे डबे, उधड्यावरील टायर्स, छतावरील प्लॉस्टिक कागद/ताडपत्री मधील पाणी, बांधकामाच्या ठिकाणी जमा पाणी इत्यादी.
– याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे.
डेंग्यूसाठी कारणीभूत एडीस डासांची उत्पत्ती घरांमध्ये व घराभोवतालील स्वच्छ पाण्यात होत असल्याने नागरिकांनी सर्व पाण्याचे साठे झाकून ठेवणे आणि पाणी साचण्याचे संभाव्य ठिकाण असणारे घराबाहेरील / टेरेसवरील भंगार सामान नष्ट केले तर नवी मुंबईत डेंग्यू आजारावर आळा घालणे शक्य होईल याची दखल घेऊन नागरिकांनी पाण्याचे साठे तपासावेत, स्वच्छ करावेत आणि झाकून ठेवावेत व या माध्यमातून डेंग्यूला हरविण्याच्या मोहीमेत नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.