मुंबई : सेझ परिसरातील कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य नसणे, ठेकेदारीची जीवघेणी स्पर्धा त्यातून अराजक निर्माण होऊन तरूणांमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सेझ क्षेत्रातील कंपन्या, खेड सिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, ग्रामस्थ यांची बैठक घेणे व पोलीस चौकीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून नियमित गस्त व सुरक्षात्मक उपाययोजना करणे अशी मागणी
सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी केली आहे .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टाव्हरे यांनी केली असता मुख्यमंत्री सचिवालयाने पोलीस अधिक्षक पुणे यांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले असल्याची माहिती टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या पुर्व भागातील सेझ क्षेत्रात खुन, मारामारीच्या गंभीर घटना सातत्याने घडत आहेत. खेड सेझ पोलीस चौकीचे उद्घाटन झाले. परंतु मनुष्यबळाअभावी तेथे नियमित पोलीस नसतात असे त्यांनी सांगितले.
१० मे रोजी रात्री गोसासी येथे पुन्हा मारामारी व गोळीबाराची घटना घडली. दहा आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर सेझ क्षेत्रातील ठेकेदारीच्या स्पर्धेतून खंडणीचा गुन्हा खेड पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. यामुळे सामान्य जनता भयभीत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाची अंमलबजावणी त्वरीत व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही त्यांनी दिला.