Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रभाजपचे सातारा नूतन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या जिल्ह्यातील स्वागतासाठी जोरदार तयारी

भाजपचे सातारा नूतन जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांच्या जिल्ह्यातील स्वागतासाठी जोरदार तयारी

सातारा : सातारा जिल्ह्याच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी आमदार डॉ. अतुल भोसले यांची निवड झाल्याने सातारा भाजपामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कराड तालुक्यामध्ये भाजप जिल्हाध्यक्षपदाची अनपेक्षितरित्या डॉ. अतुल भोसले यांच्या गळ्यात माळ पडल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सातारा जिल्ह्यात सुरु झाली आहे.
शनिवार दि. 16 मे रोजी मुंबई येथून सकाळी साडेदहा वाजता सातारा जिल्ह्याच्या हद्दीत नीरा नदीच्या तीरावर खंडाळा तालुका व सातारा जिल्हा भाजपच्यावतीने डॉ. भोसले यांचे स्वागत करण्यात येणार आहे. याठिकाणांशिवाय शिरवळ, खंडाळा, भुईंज, पाचवड, आनेवाडी टोलनाका, वाढे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे खंडाळा, वाई, जावली आणि सातारा तालुका भाजपच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी, पुष्पवर्षाव करुन स्वागत करण्यात येणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा कार्यालय, सैनिक स्कूल मैदानासमोर दुपारी दीड वाजता पक्ष कार्यालयाच्यावतीने भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्याकडून डॉ. अतुल भोसले पदभार स्विकारणार आहेत. त्यानंतर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज, स्व. यशवंतराव चव्हाण, घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर लहुजी वस्ताद यांच्या तसेच छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात येणार आहे.
दुपारी 3 वाजता खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांची जलमंदिर पॅलेस याठिकाणी व बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्यामध्ये त्यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.
सातार्‍यातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी 4 वाजता सातारा शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कराड महामार्गावर त्यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे महायुतीमधील मंत्री, आमदार व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
डॉ. अतुल भोसले यांच्या सातारा जिल्ह्यातील स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली असून सर्वसामान्य वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होवू नये, याची काळजी सातारा भारतीय जनता पक्ष घेणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने डॉ. अतुल भोसले यांच्या निवडीला महत्त्व आले आहे. सहकार क्षेत्रात भाजपची एन्ट्री फलदायी ठरण्याची आशा भाजपचे कट्टर समर्थक निलेश नलवडे, मनीष महाडवाले, विजय काटवटे, अविनाश खर्शीकर यांना वाटू लागली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments