मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, गट कार्यालय अंधेरी अंतर्गत सांताक्रुझ येथील कामगार कल्याण केंद्रात आयोजित बाल चित्रकला प्रशिक्षण शिबिर व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या म्हणून समाज सेविका प्रिया गणेश खेडेकर यांनी उपस्थित राहून आपल्या प्रेरणादायी विचारांनी बाल चित्रकारांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत अनेक बालचित्रकारांनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट आणि उत्तम कामगिरी करणाऱ्या चित्रकारांना बक्षिसे देण्यात आली, तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
मार्गदर्शन करताना खेडेकर म्हणाल्या, “चित्रकला ही केवळ एक कला नसून आत्मप्रत्यय आणि सृजनशीलतेचं माध्यम आहे. चित्र कागद, कपडा वा भिंतीवर असो, त्यामागची शैली ही चित्रकाराची ओळख असते. ती सहज उमजत नाही, ती शिकावी लागते.”
चित्रकलेतील विविध शैली, तंत्र व प्रख्यात चित्रकारांचा उल्लेख करत त्यांनी मुलांमध्ये कलात्मकता वृद्धिंगत करण्याचा संदेश दिला. त्यांनी राजा रविवर्मा, अमृता शेरगिल, एम. एफ. हुसेन यांच्यासह जागतिक चित्रकार लिओनार्डो दा विंची, व्हॅन गॉग, पिकासो यांचा उल्लेख करत प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास नागरीकांची उपस्थिती लक्षणीय होती. विभाग अधिकारी सौ. सुषमा सावरटकर मॅडम यांनी केंद्राचा कारभार शिस्तबद्ध पद्धतीने सांभाळत जनतेशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. त्यांच्या कामाचेही उपस्थितांनी मनःपूर्वक कौतुक केले.
समारंभात प्रिया गणेश खेडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. बाल चित्रकारांच्या उत्साहात भर घालणारा हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.