ठाणे : “टेरेस गार्डन”, “थ्रेड टू ट्रेंड” आणि “नेचर प्रोटेक्शनला मिठी” यांसारख्या नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून यावर्षीचा मातृदिन ठाण्यात एका विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विजयकुमार कट्टी यांना या उपक्रमांची संकल्पना मांडण्याची संधी मिळाली. हा कार्यक्रम केवळ आईप्रती आदर व्यक्त करणारा नव्हता, तर प्रत्येकाला स्वतःमधील प्रेरणाशक्ती जागृत करून निसर्गाशी नाते जोडण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा देणारा ठरला.
ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा पत्रकार संघ, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा “मातृ दिन” एका विशेष आणि अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे, जेष्ठ पत्रकार कैलास म्हापदी, दीपक दळवी, ठाणे सिटी सिटीझन फोरम चे कस्बर ऑगस्टीन, भरत अनिखंडी, महेंद्र मोने, श्री.मिस्त्री, भाऊ कांबळे, आसरा फाउंडेशन चे मोहन शिरकर, गुरुप्रीत शिरकर, अमन कोईरी, मॅको बँकेचे सहदेव बने, पर्यावरण अभ्यासक श्री.विद्याधर वालावलकर यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी ‘आई’ या संकल्पनेला व्यापक अर्थाने स्पष्ट करण्यात आले. जैविक आईसोबतच आपल्याला सतत पोषण देणारी आणि माया जपणारी निसर्गमाताही आपल्यासाठी महत्त्वाची आहे, हे उपस्थितांना सांगण्यात आले. या कार्यक्रमात सहभागी मान्यवर आणि नागरिकांनी आई आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संकल्प केला.
या छोटेखानी कार्यक्रमात 1) टेरेस गार्डन: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर टेरेस गार्डन उभारण्यात आले आहे. हे केवळ एक गार्डन नसून पर्यावरण रक्षण, कचरा पुनर्वापर, उष्णता नियंत्रण आणि सार्वजनिक शिक्षण केंद्र म्हणून विकसित होत आहे. पुनर्वापर केलेल्या लाकडी बॉक्सचा वापर, सेंद्रिय शेती पद्धती, औषधी वनस्पती आणि नागरिकांसाठी शिक्षण व संवाद केंद्र यांसारखी याची वैशिष्ट्ये आहेत. 2) थ्रेड टू ट्रेंड: या उपक्रमात जुन्या कपड्यांना पुनर्वापर करून नवीन वस्तू बनवण्यावर भर दिला जातो. जुने जीन्स आणि सुती कपडे दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, ज्यातून शबनम बॅग्स आणि मोबाईलसाठी खिशांसारख्या वस्तू तयार केल्या जातात. आणि 3) नेचर प्रोटेक्शनला मिठी: हा उपक्रम म्हणजे निसर्गाला वाचवण्याची एक चळवळ आहे. यात निसर्गाचे रक्षण करणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे रक्षण करणे आहे, हे पटवून देण्यात येते, या उपक्रमांची माहिती सांगण्यात आली.
या उपक्रमांबाबत विजयकुमार कट्टी यांनी अधिक समर्पक शब्दात सांगितले की, बदलाची सुरुवात स्वतःपासून होते. आपल्यात असलेल्या क्षमतांना ओळखून कृतीतून बदल घडवल्यास मोठे परिणाम दिसतात. या उपक्रमांना आता अधिक व्यापक स्तरावर नेण्याची योजना आहे, ज्यात इतर कार्यालये आणि शाळांमध्ये टेरेस गार्डन तयार करणे, प्रशिक्षण सत्र आयोजित करणे आणि ‘थ्रेड टू ट्रेंड’ चा विस्तार करणे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
या संपूर्ण उपक्रमात मिळालेल्या सहकार्याबद्दल विजयकुमार कट्टी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “ही केवळ माझी नाही, तर आपल्या सर्वांची गोष्ट आहे,” असेही ते म्हणाले.
आईसाठी एक जिवंत आदरांजली: ठाण्यात मातृदिनानिमित्त अभिनव उपक्रमांची प्रेरणादायी सुरुवात
RELATED ARTICLES