मुंबई : महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षकांना आता एक नवी ओळख, एक नवा सन्मान मिळाला आहे. आता मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान करण्याची शासन मान्यता मिळाली आहे. यामुळे सुरक्षा रक्षकात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही केवळ गणवेशातील रंगांची अदलाबदल नाही, तर अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेला हा गणवेश स्वाभिमानाचा रंग आहे. सुरक्षा रक्षकांच्या खाकी वर्दी मागणीसाठी झटणाऱ्या विविध संघटना, खास करून महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांच्या सातत्यपूर्ण आंदोलनात त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.
कामगार मंत्री आकाश फुडकर यांच्या हस्ते खाकी गणवेशाचे अनावरण झाले. यावेळी कामगार आयुक्त एस. पी. तुमोड, सहायक आयुक्त लोखंडे , सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिव गौरव नालींदे, उपस्थित होते.
खाकी रंगाचा गणवेश हा आता केवळ पोलीस किंवा सैनिकांचा नाही, तर सुरक्षा देणाऱ्या “सामान्य सुरक्षा रक्षकांचा असामान्य सन्मान” आहे. काही सुरक्षा रक्षकांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालत कर्तव्य बजावले. काही सुरक्षा रक्षक कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले. आजही सुरक्षा रक्षक आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडत नाही. आता गणवेशाची लढाई लढली आहे.
या गणवेशाला शोभेल असे वेतन सुरक्षा रक्षकाला मिळाले पाहिजे यासाठी यापुढची लढाई असणार आहे. त्यांच्या आरोग्य विम्याचा प्रश्न, घरांचा प्रश्न, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर लवकरच कामगार मंत्री यांची वेळ घेऊन ही सर्व प्रश्न मार्गी लागणार आहे असे लक्ष्मणराव भोसले यांनी सांगितले.
