महाबळेश्वर, ६ मे (प्रतिनिधी – नितीन गायकवाड):
मोहनदाभे गावचे सुपुत्र, युवा यशस्वी उद्योजक आणि के.एस.के. क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे आधारस्तंभ आदरणीय चंदन दादा चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त ‘के.एस.के. चॅम्पियन ट्रॉफी 2025’ ही भव्य क्रीडा स्पर्धा महाबळेश्वर येथील प्रसिद्ध पोलो ग्राउंडवर ७ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा विशेष लक्षवेधी ठरणार असून, महाबळेश्वर तालुक्यातील तमाम क्रीडा प्रेमींना यामध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रकाश माने यांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १०५ गावांतील संघ सहभाग नोंदवणार असून, विजयी संघांना त्यांच्या गावात रोषणाई करण्यासाठी सौर दिवे वाटप केले जाणार आहेत.
चंदन दादांचा वाढदिवस १० मे रोजी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमांनी साजरा केला जाणार असून, त्या निमित्ताने आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने काही विशेष घोषणा देखील करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
“समाजासाठी काहीतरी देणे लागते” या तत्त्वज्ञानातून प्रेरणा घेत, चंदन दादा चव्हाण यांनी युवकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.