प्रतिनिधी : धारावीच्या नावाखाली मुंबईतील जमीन बळकावण्याचा न्यू ईस्ट इंडिया कंपनी कट आहे. एकेकाळी पोर्तुगालने मुंबईची जमीन इंग्रजांना भेट म्हणून दिली होती, त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींचे खास मित्र अदानीला आज मुंबईतील जमीन भेट म्हणून दिली जात आहे. पण भारतात आज स्वतंत्र देश आहे आणि देशात संविधानाचे राज्य आहे. मुंबईची जमीन कोणाच्याही घशात घालू देणार नाही, असा खणखणीत इशारा मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.
धारावी बिझनेसमन असोसिएशनने आयोजित केलेल्या जन आक्रोश मोर्चात खासदार प्रा. वर्षा गायकवाड बोलत्या होत्या, यावेळी त्यांनी भाजपा युती सरकारवर तोफ डागली, त्या पुढे म्हणाल्या की, धारावीच्या नावाखाली, मोदानी आणि कंपनीने केवळ मिठागरांची जमीन, कोळीवाडे, मुंबईतील हिरवी जंगलेच नव्हे तर डंपिंग ग्राऊंड देखील ताब्यात घेण्याचा कट रचला आहे. हे सर्व केल्यानंतर, ते धारावीच्या लोकांना कचराकुंडीत पाठवतील जेणेकरून ते केवळ धारावीच्या जमिनीच नव्हे तर मुंबईच्या सरकारी जमिनींवरही कब्जा करून आपले साम्राज्य निर्माण करतील पण आम्ही हे कदापी होऊ देणार नाही.
इतर राज्यांमध्ये बुलडोझर राज चालत असेल परंतु महाराष्ट्रात फक्त संविधानाचे राज्य आहे व ते संविधानानेच चालेल असा इशारा देत मुंबईतील लोक या हुकूमशाही विरुद्ध लढण्यास तयार आहेत असे खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.
या मेळाव्यात शिवसेना खासदार अनिल देसाई, काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड उपस्थित होत्या.