नवी मुंबई – ग्रामविकासासाठी एकत्र येण्याचा आदर्श घावरी गावाने पुन्हा एकदा समोर ठेवला आहे. ‘शोध पाण्याचा… संकल्प शेतीचा’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत घावरी ग्रामस्थ सेवा मंडळाच्या पुढाकाराने आणि जलनायक किशोरभाई धारिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी एकत्र येत नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून जलसंधारणासाठी निधी संकलनाचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या उपक्रमासाठी ‘साक्षात्कार’ या नावाने एक नाटक तयार करण्यात आले असून, याचा प्रयोग नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. प्रयोगातून मिळणारा संपूर्ण निधी पाण्याचा शोध घेणाऱ्या आणि शेतीसाठी समर्पित असलेल्या या चळवळीत वापरण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास महाबळेश्वर पंचायत समितीचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी घावरी ग्रामस्थांच्या एकतेचे आणि सामाजिक जाणिवेचे कौतुक करताना, “मी पूर्वी नाटके करायचो, आता राजकारणात नाटकी करतोय!” असे मिश्किलपणे सांगत सभागृहात हास्याची लहर निर्माण केली.
जलनायक किशोरभाई धारिया यांनीही गावातील युवकांच्या उपक्रमशीलतेचे भरभरून कौतुक केले. “हे नाटक ही केवळ कला नसून, चळवळीचा एक नवा टप्पा आहे. या प्रयत्नाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. त्यामध्ये समाजसेवक संदीप म्हात्रे, नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख सुरेश संकपाळ,सुयश सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रमेश संकपाळ सर,धगधगती मुंबई वृत्तपत्राचे संपादक भीमराव धुळप, विष्णू शिंदे सर, विठ्ठल तोरणे, तसेच घावरी ग्राम सेवा संघ मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश सकपाळ, सल्लागार तानाजी सकपाळ, शाखा प्रमुख रमेश सकपाळ, व गावातून विशेषतः आलेले महादेव जाधव, प्रकाश नामदेव सकपाळ, उपसरपंच विजय सकपाळ, ग्रामपंचायत शिपाई किसन मालू जाधव यांचा समावेश होता. कार्यक्रमाची प्रस्तावना बाळकृष्ण सकपाळ यांनी केली.
या उपक्रमातून मिळणारा निधी गावाच्या जलसंधारणासाठी वापरण्यात येणार असून, घावरी गावाची ही चळवळ इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. कला, एकता आणि कृती यांचा सुंदर संगम साधणारा हा प्रयोग भविष्यातील ग्रामीण विकासासाठी एक नवा प्रकाशवाटा उघडणारा ठरत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धगधगती मुंबई चे पत्रकार राम शिंदे यांनी केले.