Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रराजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे...

राजपत्रित अधिकारी महासंघ बळकट करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी भरीव योगदान द्यावे – मुख्य सल्लागार श्री.ग. दि.कुलथे

ठाणे (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचे एक कुटुंब आहे. अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे. महासंघाने अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचे काम हाती घेतले आहे. संघटना आणखी मजबूत करण्यासाठी व कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक आज बुधवार, दि.24 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली. या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक, संस्थापक -अध्यक्ष व मुख्य सल्लागार श्री.ग.दि.कुलथे, अध्यक्ष श्री. विनोद देसाई, सरचिटणीस श्री. समीर भाटकर, आरोग्य उपसंचालक डॉ.अशोक नांदापूरकर, डॉ.अविनाश भागवत, सुदाम टाव्हरे, दिगंबर सिरामे या मान्यवरांसह ठाणे समन्वय समिती अध्यक्ष तथा निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सुदाम परदेशी, कार्याध्यक्ष तथा जि.प. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, उपाध्यक्ष इंजि. मोहन पवार, सरचिटणीस तथा जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुनिल चव्हाण, जलसंधारण कार्यकारी अभियंता श्री.पंडित राठोड, जिल्हा कृषी विकास अधिकारी श्री. रामेश्वर पाचे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. समीर तोडणकर, मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.नेताजी मुळीक, शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धीरज महांगडे, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. प्राची चिवटे, जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत, माजी सहायक संचालक श्रीकांत बाभूळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसेच अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित आहेत.
महासंघाचे मुख्य सल्लागार व मार्गदर्शक श्री. कुलथे यांनी महासंघाचे ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरु असलेल्या कामांचे कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितले. महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा, सातवा वेतन आयोग, अधिकाऱ्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यासह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगितले. महासंघाने कल्याण केंद्र बांधण्याचे स्वप्न पाहिले असून त्याचे काम बांद्रा येथील जागेत सुरू झाले आहे. या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेने यात योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग, महागाई भत्ता, बालसंगोपन रजा, खंड दोन नुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरुद्ध कायदा तयार करणे, नवीन निवृत्ती वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणे अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्या आहेत. महासंघामुळे शासकीय अधिकाऱ्यांना लाभ होत आहेत. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन महासंघाची शक्ती आणखी वाढविण्यासाठी हातभार लावावा. यासाठी जिल्हास्तरावरील समन्वय समिती मजबूत होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनीही महासंघाच्या वतीने आतापर्यंत केलेल्या कामांची माहिती दिली. महासंघाच्या पाठपुराव्यामुळेच अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून अनेक सुविधा मिळाल्याचे सांगितले. यापुढील काळातही महासंघाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या मागण्यांसाठी लढा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कल्याण केंद्राचा निधी जमा करण्यासाठी महासंघाच्या वतीने अँप विकसित करण्यात आला असून या अॅपद्वारे सदस्यांना निधी जमा करून त्याची पावती घेता येणार आहे. जास्तीत जास्त सदस्यांनी या अॅपद्वारे ऑनलाईन निधी द्यावा, असे आवाहन श्री. भाटकर व श्री. सानप यांनी जिल्ह्यातील सर्व राजपत्रित अधिकाऱ्यांना केले.
ठाणे जिल्हा समन्वय समितीचे अध्यक्ष सुदाम परदेशी व कार्याध्यक्ष अविनाश सातपुते यांनी महासंघाचे काम आणखी वाढविण्यासाठी व संघटन चळवळ मजबूत करण्यासाठी तसेच महासंघाच्या कल्याण केंद्राच्या निधीसाठी जिल्हा समन्वय समिती भरीव योगदान देईल, असे आश्वासन दिले.
ठाणे समन्वय समितीचे सरचिटणीस मनोज शिवाजी सानप यांनी प्रास्ताविकात जिल्हा समन्वय समितीच्या कामकाजाची व बैठक आयोजनामागील भूमिका मांडली. उपाध्यक्ष मोहन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी महासंघाच्या कल्याण केंद्रासाठी 11 हजार रुपयांचा निधी श्री. कुलथे यांच्याकडे सुपूर्द केला तर श्री. सानप यांनी ऑनलाईन 11 हजार रुपये जमा करून आपले योगदान तात्काळ दिले.

महासंघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाची वार्षिक डिरेक्टरी भेट
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीनंतर महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग. दि. कुलथे, अध्यक्ष विनोद देसाई, सरचिटणीस समीर भाटकर यांच्यासह जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. कुलथे यांनी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांना महासंघाच्या वतीने प्रकाशित केलेली वार्षिक डिरेक्टरी-2024 भेट दिली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments