सातारा(अजित जगताप) : भारत देशात सुमारे तीन हजार जाती व पंचवीस हजार पोट जाती आहेत. केंद्र सरकारने देशात जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी (30 एप्रिल) पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी सातारा शहरातील शिवतीर्थावर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाडू वाटून या निर्णयाचे स्वागत केले. वास्तविक पाहता गेली अकरा वर्ष भारतीय जनता पक्षाने जातीनिहाय जात गणना केली नाही. उलट राजकीय विरोधकांनी सातत्याने मागणी केल्यानंतर आज निर्णय झाला. भाजपने लाडू वाटून त्याचे श्रेय घेण्याचा केविलवाणी प्रयत्न साताऱ्यात केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
२०११ व २०१५ मध्ये सामाजिक-आर्थिक जातनिहाय जनगणना करण्यात आली होती. परंतु, या प्रक्रियेत संकलित झालेली माहिती उघड करण्यात आली नाही. याचा मात्र सत्ताधारी व विरोधकांनाही विसर पडला आहे. पहलगाम हल्ल्याचे हल्लेखोर अद्यापही सापडले नसताना जातगणनाची घोषणा केली जात आहे . मागासलेल्या बिहार राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ लागलेला आहे.
१९३१ च्या पहिल्या जनगणनेनुसार भारतातील जातींची संख्या ४,१४७ होती, तर २०११ मध्ये केलेल्या जातीच्या जनगणनेनुसार जातींची एकूण संख्या ४६ लाखांहून अधिक नोंदवली गेली.
२०११ मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणेतील आकडेवारीविषयी महाराष्ट्राचे उदाहरण केंद्राने दिले. महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय गटात मोडणाऱ्या जातींची संख्या ४९४ होती, तर जनगणनेमध्ये महाराष्ट्रातील एकूण जातींची संख्या४,२८,६७७ नोंदविण्यात आली आहे. सदर जात निहाय जनगणना पूर्ण होण्यासाठी किमान पाच वर्षाचा कालावधी लागणार आहे. महत्वाचे म्हणजे या जात निहाय जनगणनेची माहिती व त्याची अंमलबजावणी केव्हा होणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. त्यामुळे राजकीय जुमला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, साताऱ्यात या निर्णयाबाबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सुवर्णाताई पाटील, अमित कुलकर्णी, अविनाश कदम, विकास गोसावी, सातारा शहर अध्यक्ष अविनाश खर्शीकर यांच्यासह मान्यवर भाजप पदाधिकाऱ्यांनी लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. तर जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या साताऱ्यातील प्रमुख कार्यालयात शुकशुकाट जाणवत होता.
______________________________
महत्वपूर्ण चौकट — भारतीय जनता पक्ष नेहमीच काँग्रेसवर टीका करते. परंतु, यापूर्वी काँग्रेसमध्ये असलेले व सध्या भाजपवासी झालेले काही पदाधिकारी सुद्धा काँग्रेसवर जातनिहाय जनगणनेबाबत टीका करत आहेत त्याबाबत अनेकांना नवल वाटले.
——– ———- ———- ——— —- —
फोटो– सातारा शिवतीर्थावर लाडू वाटप करताना भाजपचे कार्यकर्ते (छाया– अजित जगताप, सातारा)