प्रतिनिधी : मुंबईतील इंदू मिल परिसरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे 450 फूटांचे स्मारक उभारले जात आहे. त्यामध्ये 350 फूट उंच भव्य पूर्णाकृती पुतळा साकारला जात आहे. या ऐतिहासिक प्रकल्पाची कामे आता अंतिम टप्प्यात आहे. पुढील दीड ते दोन वर्षात स्मारक पूर्ण होईल, असे संकेत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप भाई कवाडे यांनी दिले. या स्मारक प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जयदीप कवाडे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.
या पाहणी दौऱ्यात प्रकाश भांगरे (मुख्य अभियंता, एमएमआरडी), मनोज इंगळे (कार्यकारी अभियंता, एमएमआरडी), अतुल कवटीकवार (टीम लीडर – शशी प्रभू आणि असोसिएट्स), विनय बेडेकर (निवासी आर्किटेक्ट – डिझाइन असोसिएट्स), कुणाल मेहता (निवासी अभियंता – शशी प्रभू असोसिएट्स), उमेश साळुंखे (प्रकल्प व्यवस्थापक – शापूरजी पालोनजी अँड कंपनी प्रा. लि.), वाजिद शेख (वरिष्ठ नियोजन व्यवस्थापक – शापूरजी पालोनजी अँड कंपनी प्रा. लि.), पीरिपाचे पदाधिकारी प्रदेश संघटक कपिल लिंगायत, आनंद कडाळे, अतुल श्रा. तांबे दिलीप कापसे, सचिन ऊपल, संदीप साळवी यांच्यासह पीरिपाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या ऐतिहासिक स्मारकाचे 100 फुटांचे काम पूर्ण झाले आहे. पद्मभूषण राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कार्यशाळेत 350 फूट उंच पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडी) या भव्य प्रकल्पाची जबाबदारी पार पाडत आहे. जयदीप भाई कवाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला भेट देत वंदन केले आणि नंतर स्मारक स्थळी पाहणी करताना एमएमआरडी अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. बाबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि घटनात्मक कार्याचा प्रभावी दस्ताऐवज तयार करण्यासाठी स्मारकात डिजिटल तंत्रज्ञान, ऑडिओ-विज्युअल माध्यमे, इंटरेक्टिव्ह डिस्प्ले, लेझर शो यांचा समावेश करण्यात येणार आहे. कवाडे यांनी सांगितले की, “हे स्मारक जागतिक दर्जाचे असावे आणि बाबासाहेबांचे विचार जगभर पोहोचावेत, यासाठी देश-विदेशातील स्मारकांचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या नियोजनात करावे अशी सूचना जयदीप भाई कवाडे यांनी अधिकाऱ्यांना दिली.
गुणवत्तेवर भर, फेजनुसार अंमलबजावणी करा
जयदीप भाई कवाडे यांनी सांगितले की, जागतिक दर्जाच्या या स्मारकातील व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र यासारख्या घटकांमध्ये स्वच्छता, सुरक्षा आणि कार्यक्षमतेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे. कवाडे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, कामांची गुणवत्ता राखत इलेक्ट्रिकल व तांत्रिक कामे समांतरपणे व फेजनुसार पूर्ण करण्यात यावीत, जेणेकरून स्मारक वेळेत म्हणजेच वर्षभरात पूर्ण होऊ शकेल. सचिवांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत समितीने देखभाल व दुरुस्तीबाबत आवश्यक निर्णय घ्यावेत, असेही त्यांनी स्पष्टपणे जयदीप भाई कवाडे यांनी सांगितले. यावेळी समिती सदस्य, कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून कवाडे यांनी स्मारकाच्या कामातील सुधारणा, अडथळे व पुढील योजना यांचा सविस्तर आढावा घेतला.