प्रतिनिधी : सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अखेरपर्यंत झटणारे लोकनेते एकनाथराव गायकवाड यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिवस आदरपूर्वक साजरा करण्यात आला. गायकवाड अण्णांनी राजकारणात राहून समाजकारणाला नेहमीच अधिक महत्त्व दिले. गोरगरिबांच्या हक्कासाठी ते नेहमी ढाल बनून उभे राहिले.
समतेचे आणि एकतेचे अधिष्ठान असलेले गायकवाड यांनी माणुसकीचे मोल जनमानसात रुजवले. लोकसेवेवरील त्यांची निष्ठा, निःस्वार्थी भावना, सामान्य जनतेप्रती असलेला जिव्हाळा आणि आपुलकी यामुळे त्यांचा जनसंपर्क विशेष व्यापक होता. समाजवादी आणि मानवतावादी विचारसरणीने त्यांनी समाजाला नवे दिशा दिल्या.
“असत्यापुढे झुकायचं नाही, सत्यासाठी मागे हटायचं नाही, लढायचं न्यायासाठी, एक दिवस विजय आपलाच होईल,” हा त्यांच्या जीवनाचा मूलमंत्र होता आणि आजही त्यांच्या विचारांचा उजेड कार्यकर्त्यांना प्रेरणा देतो आहे.
गायकवाड अण्णांच्या प्रगल्भ विचारांच्या प्रेरणेने त्यांच्या अनुयायांनीही स्वतःला समाजसेवेसाठी वाहून घेतले आहे. आजच्या दिवशी त्यांच्या कार्याचे स्मरण करताना सर्वच स्तरातून त्यांच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यात आले. गायकवाड यांना अभिवादन करण्यासाठी आमदार डॉ ज्योतीताई गायकवाड यांच्यासह धारावी काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.