Wednesday, August 27, 2025
घरमहाराष्ट्रधारावीत चर्मकार समाजाचा प्रचंड महामेळावा संपन्न ...

धारावीत चर्मकार समाजाचा प्रचंड महामेळावा संपन्न चर्मकार समाजाची देशात एकजूट आवश्यक, बाबुराव माने

प्रतिनिधी : चांभार, होलार, ढोर मेदिगा, मोची अशा असंख्य जाती-उपजातींमध्ये चर्मकार समाज हा देशात विखुरलेला आहे. विशेष म्हणजे या सर्व जाती-उपजातींचे नाते हे चामड्याशी आहे. तर मग जाती वेगवेगळ्या कशाला ? आपण सारेजण एक आहोत. एकी ठेवली तरच सरकारवर दबाव येईल. यासाठी चर्मकार समाजाच्या ऐक्यासाठी देशात चळवळ उभी करा असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने यांनी केले.
राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मुंबई प्रदेश समितीने माने यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार समाजाचा महामेळावा धारावी मधील मनोहर जोशी महाविद्यालयाच्या महिना मैदानावर शनिवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माने हे बोलत होते होते. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून फुले आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्या साहित्यिका आशालता कांबळे, राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई अध्यक्ष विलास गोरेगावकर, माजी मंत्री सूर्यकांत गवळी, मीराताई शिंदे, परशुराम इंगोले, ज्ञानोबा माने, जियालाल जयस्वाल, संभाजी ब्रिगेडचे सुहास राणे,शारदाताई नवले भगत आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या समाजावर होणारे अन्याय, सरकारकडे आपण करीत असलेल्या मागण्या याबाबत आपल्याला न्याय हवा असेल तर आपल्या समाजाची राष्ट्रीय स्तरावर व्यापक एकजूट ही दिसली पाहिजे असे आवाहन करून माने पुढे म्हणाले आपल्या समाजातील तरुण मुले,मुली ही मोठ्या संख्येने आयएएस, आयपीएस झाली पाहिजेत. मोठ्या हुद्द्यावर आपला युवा वर्ग बसला पाहिजे. यासाठी आपल्या समाजाने पुस्तकांशी मनोभावे नाते जोडले पाहिजे. महाराष्ट्रात काही धनदांड्यांनी आपल्या समाज बांधवांच्या जवळ जवळ ५० एकर जमिनी बळकावल्या होत्या. त्या आपल्या समाज बांधवांना परत मिळवून देण्याचे काम आपल्या राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेले आहे. तसेच माता भगिनींवर अन्याय अत्याचार झालेल्या घटनांमधील आरोपींना जेलची हवा खायला लावली आहे असेही माने यांनी यावेळी सांगितले.
संत तुकाराम, शिवाजी महाराज, महात्मा फुले, घटनाकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यासारखे संत, महामानवांचे विचार मनुवादी व्यवस्थेने तेंव्हा गाडले होते अशी परखड आशाताई कांबळे यांनी केली.तर संत रविदास यांचे बेगमपुरा गीत, संत कबीर यांचे अमर प्रेम गीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनटचेबल हे पुस्तक यामधील सर्व सार,मतितार्थ हे गौतम बुद्धाच्या सुखवंती या संकल्पनेतून उदयास आलेले आहे. आणि हेच सार समाजाच्या समतेसाठी आवश्यक असल्याचे आशाताईंनी यावेळी स्पष्ट केले.
या महामेळाव्यास विलास गोरेगांवकर, माजी मंत्री सूर्यकांत गवळी, नारायण गायकवाड, संजय शिंदे, मीराताई शिंदे, राजेंद्र बाविस्कर, जियालाल जयस्वाल, मितालीताई सोनवणे, ज्ञानोबा माने, बाळाजी सोनटक्के, प्रकाश दिघे, आबासाहेब पतंगे, देविदास फराटे, भाऊसाहेब घोडके, महादेव शिंदे, गणेश खिल्लारे, परशुराम इंगोले, संभाजी ब्रिगेडचे सुहास राणे, कुपर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेंढे, मुस्लिम ब्रिगेडचे दफेदार, जगन्नाथ वाघमारे यासह असंख्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. संत,महामानव,महामातांची संयुक्त जयंती साजरी

या महामेळाव्यात संत रवीदास, वीर कक्कया महाराज,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,घटनाकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ आणि माता सावित्रीबाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने या संत,महामानव, महामातांचे स्मरण करुन त्यांना पुष्पहार अर्पण करुन साजरा करण्यात आला.
निष्पाप पर्यटकांना भावपूर्ण श्रध्दांजली…

कश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले.या सर्व पर्यटकांना बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व चर्मकार बांधवांनी दोन मिनिटे स्तंब्ध उभे राहून या महामेळाव्यात भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

यावेळी संत श्री गुरु रविदास महाराज यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणारे पुणे लोणी काळभोर येथील राजाभाऊ हनुमंत शिंदे, गेले अनेक वर्ष श्री साईप्रसाद विवाह संस्था चर्मकार समाजासाठी विनामूल्य राबवणारे बाबुराव आनंदराव सोनवणे, ढोर समाजातील संत विचारवंतांचे कार्य विविध लेखांच्या माध्यमातून प्रसारित करणारे निवृत्त शासकीय अधीक्षक अभियंता रमाकांत सावळाराम नारायणे, समाजसेविका आणि अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या निवृत्त आधि परिचारिका सुधाताई जोगदंड आणि समाजसेवक शहाजीराव सातपुते या सर्वांना बाबुराव माने यांच्या हस्ते राष्ट्रीय चर्मकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना चर्मकार समाजा तर्फे मानवंदना देण्यात आली.
या महामेळाव्याचे सूत्रसंचालन प्रा. शारदा नवले मॅडम यांनी केले. आंबेडकरी प्रसिद्ध शाहीर राजेश शिर्के प्रसिद्ध भीम गीत गायिका दिक्षा शिर्के यांनी भीमगीते सादर करुन रसिकांना यावेळेस मंत्रमुग्ध केले.
.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments