कराड (प्रतिनिधी – विजया माने) : प्रेम आणि बंधुभावना जागवणारा ‘मानव एकता दिवस’ संत निरंकारी मिशनतर्फे दरवर्षी २४ एप्रिल रोजी, बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा केला जातो. हा दिवस केवळ पुण्यस्मरणाचा नाही तर मानवता, सौहार्द आणि एकतेच्या मूल्यांचा आत्मिक संगम घडवणारा असतो.
यंदाही २४ एप्रिल रोजी, कराड येथील सत्संग भवनात दुपारी ३ ते ६ या वेळेत ‘मानव एकता दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला. संत निरंकारी मिशन सातारा झोनचे प्रचारक सुरेश पोळ (सांगली) यांच्या उपस्थितीत हा भाविकतेने परिपूर्ण सत्संग सोहळा पार पडला. कराड, ढेबेवाडी, नांदगाव, रेठरे बुडे, उंब्रज आणि परिसरातून मोठ्या संख्येने श्रद्धावान भाविकांनी सहभाग घेतला.
युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी सत्यबोधाच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा आणि व्यसनमुक्ती यांसाठी जागृती घडवली. साधे विवाह, युवा वर्गाला सकारात्मक विचारांशी जोडणे अशा अनेक लोककल्याणकारी चळवळींना त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या पवित्र कार्याला पुढे चालवताना, बाबा हरदेवसिंहजी यांनी ‘रक्त नाड्यांत वाहावे, नाल्यांमध्ये नाही’ हा संदेश देत रक्तदानाला मिशनच्या आध्यात्मिक सेवेचा अविभाज्य भाग बनवले. आजही प्रत्येक निरंकारी भक्ताच्या हृदयात सेवा आणि समर्पणाची ही प्रेरक ज्योत तेवत आहे.
समारोहाचे सुयोग्य आयोजन सातारा झोनचे प्रभारी नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कराड शाखेचे प्रमुख दिलीप कोरडे (आबा), शाम काळे, सेवादल संचालक डॉ. प्रकाश पाटील, सेवादल भगिनी तसेच सर्व शाखांचे मुखी व सेवादल अधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.
यावेळी माजी विधान परिषदेचे आमदार मा. आनंदराव पाटील (नाना) यांनी विशेष सदिच्छा भेट देऊन निरंकारी मिशनच्या कार्याबद्दल भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन हर्षल कोरडे यांनी केले.