महाबळेश्वर(अजित जगताप ) : थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर मध्ये सध्या‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’च्या तयारीचा चांगल्याच वेग आलेला आहे .या महोत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वर नगरीमध्ये सुख सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या असून पर्यटनाच्या अनुषंगाने काउंटडाऊन सुरू झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सातारा जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हा पर्यटन महोत्सव शुक्रवार दिनांक २ ते रविवार दिनांक ४ मे २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार दिनांक एक मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन असल्यामुळे पर्यटकांची वाढती गर्दी पाहून उच्चांकी रोजगार व व्यवसाय उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाबळेश्वर येथील पर्यटन महोत्सवाच्या अनुषंगाने पर्यटन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेब यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात महोत्सवाच्या नियोजनाचा बारकाईने आढावा घेतला.
या महोत्सवास राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर येणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय राखून चोखपणे जबाबदारी पार पाडण्याची सूचना सर्वांना देण्यात आलेली आहे. देशी व परदेशी पर्यटकांना महाबळेश्वर महाव पर्यटन महोत्सवाचा आनंद द्विगणित करून देण्यासाठी कोणतेही अडचण येऊ नये. याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभाग यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमात हेलिकॉप्टर राईड, लेसर शो, स्वरोत्सव, साहसी उपक्रम, फुड फेस्ट आणि आनंदयात्रा, लहान मुलांसाठी विविध खेळ, कार्निवल परेड, उत्सव महाराष्ट्राचा समृध्द परंपरेचा, किल्ला व शस्त्र प्रदर्शन, साहसी व मर्दानी खेळ, टेंटसिटी, ड्रोन शो, योग, वाद्यसंगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, बोट प्रदर्शन यास अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला आहे.
महोत्सवाच्या आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करावी. असे निर्देश पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांनी दिले आहेत. यासाठी नामांकित एजन्सीची नेमणूक केलेली आहे. त्या महोत्सवाला व्यापक प्रसिद्धी देणाऱ्या सर्वच घटकांचा विचार करून त्यांनाही सुविधा देण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील विशेषता जावळी व महाबळेश्वर येथील स्थानिक पत्रकार संघटनेच्या अनेक मान्यवरांनी केलेली आहे
महाबळेश्वर महोत्सवाला चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. यासाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, सातारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या क्षमा पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे यांच्या महाबळेश्वर नगरपालिका प्रशासन व पोलीस यंत्रणा त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते यांचा सुद्धा मोलाचे योगदान लाभत आहे. एकूणच या महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव मधून राज्यातील पर्यटन वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्याचा संदेश जाणार आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्राला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने झळाळी येणार आहे. उन्हाळ्यामध्ये शाळा- महाविद्यालय व इतर घटकाला सुट्टी असल्यामुळे या पर्यटन महा पर्यटन महोत्सवाला किमान लाखभर पर्यटन देण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
________________________________________
फोटो– महाबळेश्वर महा पर्यटन महोत्सवाच्या तयारीचे काउंटडाऊन सुरू.. (छाया- निनाद जगताप महाबळेश्वर)