Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रपालिका क्रीडाभवन पुनर्विकासास जनता दलाचा आक्षेप

पालिका क्रीडाभवन पुनर्विकासास जनता दलाचा आक्षेप

मुंबई : महापालिका मुख्यालयासमोरील बृहन्मुंबई महापालिका क्रीडाभवन जिमखान्याच्या जागेवर काचेचा घुमट असलेला टाऊन हॉल, व्ह्युइंग गॅलरी, कॅफेटेरिया आदी उभारण्याचा निर्णय म्हणजे ‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ असा प्रकार असल्याची टीका जनता दल (से) मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीने (मास) केली असून या जागेवर महापालिका कर्मचाऱ्यांचे क्रीडाभवनच कायम ठेवण्याची मागणी केली आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्रीडाभवन जिमखान्यासाठी १९२६ साली तत्कालीन महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडून जागा मिळवून ती क्रीडा संकुलासाठी उपलब्ध करून दिली होती. पुढील वर्षी याला शंभर वर्षे होत असताना, एक वर्ष आधी क्रीडाभवन जीमखानाच गुंडाळण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करीत आहे, असे मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, सरचिटणीस प्रशांत गायकवाड, जिल्हाध्यक्ष जगदिश नलावडे, संजीवकुमार सदानंद, यतिन तोंडवळकर तसेच मासचे दिनेश राणे, संग्राम पेटकर यांनी म्हटले आहे.
मुंबई महापालिका क्रीडा भवन हा महापालिकेचा एक स्वतंत्र उपक्रम असून त्याची स्वतंत्र घटना व नियमावली आहे. महापालिका आयुक्त हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असून, दोन आयुक्त उपाध्यक्ष तसेच कामगार अधिकारी, लेखापाल, विधी अधिकारी हे सदस्य आहेत. याशिवाय कर्मचारी प्रतिनिधींचा या कमिटीत समावेश आहे.
क्रीडाभवनाचे दहा हजाराहून अधिक सभासद, अडीच हजार आजीव सभासद असून दर दोन वर्षांनी त्याची निवडणूक होते. क्रीडाभवनाच्या अर्थसंकल्प करोडो रुपयांचा असून लाखो रुपयांच्या ठेवी आहेत. या क्रीडाभवनातर्फे महापालिका मुख्यालयासमोरीलच नव्हे तर शिवाजी पार्क तसेच विविध विभाग कार्यालये, यानगृहे, रुग्णालये, मुद्रणालय आदी मिळून ३१ ठिकाणी क्रीडा केंद्र चालविली जातात. कबड्डी, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, फुटबॉल, व्हॉलीबॉल, पॉवरलिफ्टिंग, वेटलिफ्टिंग अशा विविध खेळांच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. संबंधित खेळाडूंनी अखिल भारतीय महापालिका स्पर्धांमध्ये तसेच टाइम्स शिल्ड क्रिकेट सारख्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविले आहेत. क्रीडाभवन मुंबई क्रिकेट असोसिएशनशीही संलग्न आहे.
आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या कारणाने २०१० च्या सुमारास कार्यकारिणी बरखास्त करून जबाबदारी ए विभाग व जी नॉर्थ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांकडे सोपविण्यात आली होती. दुसरीकडे तपास करून दोषींवर कारवाईही करण्यात आली. त्यानंतर निवडणूक घेऊन कारभार पुन्हा कार्यकारणीकडे सोपविणे आवश्यक होते. परंतु तसे न करता ए विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी बदली झाल्यानंतरही क्रीडाभवनचा कारभार बेकायदेशीररित्या आपल्या अखत्यारीत ठेवला आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी निवडणुका घेऊन कारभार कार्यकारिणीकडे सोपविण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही निवडणूक घेण्यात आलेली नाही. आता मात्र ‘क्रीडाभवन कार्यकारणी’ अस्तित्वात नसताना परस्पर निर्णय घेऊन या जागेचा पुनर्विकास करण्याचे घाटत आहे.
या पार्श्वभूमीवर क्रीडाभवनाच्या जागेवर जिमखान्याचीच वास्तू उभारली गेली पाहिजे, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्ष व मूलभूत अधिकार संघर्ष समितीने महापालिका कर्मचाऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त भुषण गगराणी यांच्याकडे केली आहे.
तसेच तातडीने निवडणुका घेऊन क्रीडाभवनाची कार्यकारणी अस्तित्वात आणावी व त्यानंतरच या वास्तूच्या पुनर्विकासाचा विचार करावा असेही महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments