प्रतिनिधी : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेला मुंबईसह महाराष्ट्रात उधाण आले असताना ही शक्यता प्रत्यक्षात यावी आणि ठाकरेंच्या युतीची, बाबुराव माने मनोमिलनाची सुरुवात धारावीतून व्हावी, अशी इच्छा धरावी बचाव आंदोलन समितीने व्यक्त केली आहे.
धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक बाबुराव माने यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या केवळ हालचाली महाराष्ट्र ढवळून काढत आहेत. हे दोघे भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचे राजकारण बदलून जाईल आणि महासत्तेने महाराष्ट्राच्या गळ्यात मारलेली अनेक समीकरणेही बदलतील.
उभ्या महाराष्ट्रात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना वगळता जवळजवळ सर्वच पक्ष धारावी बचाव आंदोलनाच्या बाजूने उभे आहेत.
शिवाय एक स्वयंपूर्ण असलेले धारावीसारखे नगर उद्ध्वस्त करून त्यावर गौतम अदानी समूह आपले रिअल इस्टेटचे साम्राज्य उभे करण्यास निघाला आहे. धारावीतले उद्योग धारावीबाहेरच नव्हे, तर मुंबईच्याही बाहेर काढले जातील आणि किमान पंधरा लाख धारवीकरांना अपात्र ठरवून मुंबईत मुंबईबाहेर मिळेल जागा तिथे त्यांना भाड्याच्या घरात टाकले जाणार आहे. अदानीच्या या दडपशाहीविरुद्ध धारावीकर एकवटून लढत आहेत. या लढ्याचे नेतृत्व आता उद्धव आणि राज यांनी संयुक्त सभा घेऊन करावे आणि महाराष्ट्रातील राजकीय नवनिर्माणाची सुरुवात करावी, अशी विनंतीही बाबूराव माने यांनी केली.
संयुक्त सभेचे विनंतीपत्र उद्धव आणि राज यांना धारावी बचाव आंदोलनाकडून रितसर दिले जाणार आहे. ते त्यांनी स्वीकारले तर ठाकरे बंधूंच्या आणि ओघानेच उद्धव सेना आणि मनसेच्या राजकीय युतीचा तो शुभारंभ ठरेल, असा विश्वासदेखील धारावी बचाव आंदोलनाने व्यक्त केला.