Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रनायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद...

नायगांव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक, १४२ कोटींची तरतूद…

नायगाव(अजित जगताप) : स्त्री शिक्षणाची मशाल पेटवणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मौजे नायगाव येथील या स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपये तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्मारकाची घोषणा केली होती. त्यानुसार आज मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचे हे स्मारक त्यांच्या कार्याला अभिवादन ठरणार आहे. तसेच सोबतच उभे राहणारे महिला प्रशिक्षण केंद्र या परिसरातील महिलांसाठी सबलीकरणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
महिला प्रशिक्षण केंद्राचे दीर्घकालीन व्यवस्थापन, प्रशासन, तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी सातारा यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, यशदा, कौशल्य विकास विभाग तसेच ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे प्रतिनिधी यांचा समावेश राहणार आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ ,पर्यटन व मदत मंत्री नामदार मकरंद पाटील व ग्राम विकास तथा पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे व सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह अनेक मान्यवरांनी यासाठी पाठपुरावा केला होता. महायुतीने घेतलेल्या या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांना अजून एक प्रेरणादायक स्थळ निर्माण झालेले आहे. या निर्णयाचे नायगावच्या सरपंच सौ नेवसे, भाजप महिला नेत्या श्रीमती गीता लोखंडे व भाजप ज्येष्ठ कार्यकर्ते विजय काटवटे, सातारा भाजप शहराध्यक्ष श्री अविनाश खर्शीकर , अमोल कांबळे व सुनील काळेकर यांच्यासह सातारा जिल्ह्यातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.

——- ——- ——– ——- —– —-
फोटो नायगाव येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक (छाया- निनाद जगताप नायगाव)

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments