5प
्रतिनिधी : विलेपार्ले येथील पुरातन जैन मंदिरावर मुंबई महानगरपालिकेने (BMC) केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ अंधेरीतील के पूर्व महापालिका कार्यालयावर समस्त जैन समाजाच्या वतीने भव्य आणि अहिंसक आंदोलन मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने जैन बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनात राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार वर्षाताई गायकवाड,आमदार पराग शहा यांच्यासह अनेक प्रतिष्ठित जैन मुनी आणि समाजाचे नेते उपस्थित होते. मोर्चादरम्यान समाजाकडून जोरदार निषेध व्यक्त करण्यात आला.
जैन समाजाने स्पष्टपणे सांगितले की, “ही कारवाई केवळ एका धार्मिक स्थळावर नव्हे, तर संपूर्ण समाजावरतीच आघात करणारी आहे. राधाकृष्ण हॉटेलच्या सोयीसाठी मंदिरावर कारवाई करण्यात आली असून, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”
मोर्चाच्या वेळी जैन समाजाने एकमुखी मागणी केली की, “जे मंदिर पाडलं, त्यांनीच ते पुन्हा बांधून द्यावं, आणि तेही पूर्वीप्रमाणे कलशासहित पूर्ण स्वरूपात.” मंदिराचे आधीचे स्वरूप जपून, त्याचा पुनर्बांधणीचा निर्णय त्वरीत घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या प्रकरणामुळे धार्मिक भावना दुखावल्या असून, समाज अहिंसक मार्गाने आपला विरोध व्यक्त करत आहे. मात्र, वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील दिला गेला.