Monday, August 18, 2025
घरमहाराष्ट्रप्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेंतर्गत एप्रिलच्या पंधरवड्यात 85 हजार दंडात्मक वसूली व 283.700 किलो...

प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमेंतर्गत एप्रिलच्या पंधरवड्यात 85 हजार दंडात्मक वसूली व 283.700 किलो प्लास्टिक जप्त; नवी मुंबई महापालिकेची कारवाई

नवी मुंबई : प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमांव्दारे एकल वापरातील प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची विशेष पथके मार्केटमध्ये तपासणी करीत आहेत तसेच प्लास्टिकचा साठा वितरणासाठी वाहतुक करणा-या वाहनांवरही लक्ष ठेवून कारवाई करीत आहेत.

अशा प्रकारच्या दोन प्रतिबंधात्मक धडक कारवाया लागोपाठ 2 दिवस परिमंडळ 2 च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांच्या वतीने उपआयुक्त डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आल्या. यामध्ये 17 एप्रिल रोजी महापे एमआयडीसी परिसरात दुचाकी वाहनावरून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा 20 किलो साठा वाहून नेणा-या दुचाकी वाहनावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला व त्याच्याकडील प्लास्टिक जप्त करून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

त्याचप्रमाणे याच परिमंडळ 2 च्या पथकाने 18 एप्रिल रोजी ऐरोली टोल नाका येथे 60 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक दुचाकीवरून वाहतुक करणा-या व्यक्तीकडूनही 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करून 60 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.

याशिवाय 17 एप्रिलला कोपरखैरणे येथे सेक्टर 18 मधील रावराय जनरल स्टोअर्स यांचेकडून 5 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली करण्यात आली. त्याचप्रमाणे सेक्टर 20 ऐरोली येथे महेंद्र प्रजापती यांचेकडूनही 1 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

अशाप्रकारे परिमंडळ 1 व परिमंडळ 2 च्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक भरारी पथकांमार्फत उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व डॉ.कैलास गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात 17 व्यक्ती / व्यावसायिकांकडून 85 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली असून 283 किलो 700 ग्रॅम प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिक साठा जप्त करण्यात आलेला आहे.

तरी विशेषत्वाने एकल वापर प्लास्टिकमुळे मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोहचणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वत:हून स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा व कापडी /कागदी पिशव्यांचा पर्याय निवडावा तसेच व्यावसायिकांनीही आपल्या वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत व प्लास्टिक पिशव्या दुकानात ठेवूच नयेत असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments