प्रतिनिधी : महामानव, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, या देशातील कोट्यावधी जनतेचे उद्धारकर्ते मायबाप पूजनीय डॉ. भीमराव तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम…!
डॉ बाबासाहेब आंबेडकर या भारत भूमीत जन्मले हे आपले सर्वांचे भाग्य आहे. 14 एप्रिल या दिवशी देशात आनंदी उत्साही वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते, त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करून त्यांच्या प्रती कृतार्थ भाव प्रकट केला जातो. असे हे जगातील एकमेव उदहारण असेल की त्यांची जयंती फकत भारतात नाही तर विदेशात ही साजरी केली जाते आणी चौका चौकात आणी देश विदेशात पण त्यांचे पुतळे उभारले आहेत.
आजच्या दिवशी त्यांच्या विचाराचे सर्व अनुयायी सजून धजून त्यांच्या फोटो ला किंवा पुतळ्याला पुष्पहार घालून मेणबत्ती लावून वंदन करतात . घरेदारे,कार्यालये यांची सजावट करून, ढोलताशा वाजवून,गीत गाऊन, अन्नदान करून, फळे वाटून, रक्त दान करून असे नाना प्रकारे अभिवादन केले जाते.
भारतात काही भागात या थोर महामानवाच्या विद्वतेला ला आणी लेखणीला समर्पित होऊन अभिवादन करण्यासाठी या दिवशी 18 तास अभ्यास करून त्यांनी कसा अध्ययनाचा ध्यास उराशी बाळगून परिश्रम पूर्वक विद्ववत्ता कशी संपादित केली हा संदेश देतात . शाळा कॉलेजात त्यांनी लिहिलेल्या आणी संपादित केलेल्या पुस्तकांच्या खंडा चे सामुदायिक वाचन केले जाते तर कुणी त्यांच्या कार्य कर्तृत्वावर वर कविता करून,भीमगीत- पोवाडे गातो तर कुणी संबोधन पर भाषण करतो. असे अनेक उपक्रमाने या दिवसाचे महत्व कळते. असे हे करण्याचे कारण म्हणजे या महामानवाच्या विचारांमध्ये मधे ओतप्रोत भरलेला मानवतावाद, मानवजातीच्या कल्याणाचा ध्यास घेऊन त्यांनी आपल्या कृतीने जगाला समृद्ध केले.
असे हे भारतात जन्मलेले अगाध ज्ञान प्राप्त केलेले, महान विद्ववान बुद्धिमान,तत्ववेत्ता, जन्माने नाही तर कर्माने ते पंडित झाले होते.
त्यांच्या सर्वसामावेशक विचाराने भारताला एकात्मता आणी अखंडता प्रदान करून मजबूत करण्याची ताकद दिली. भरताचा इतिहास,भूगोल,नगरिक शास्त्र आणी सामान्य ज्ञान विज्ञाना बरोबरच जगाचा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यातील महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन जनकल्याणसाठी ते रात्रंदिवस झटले. भारतात बऱ्याच काळाने चालत आलेल्या अमानवीय प्रथा परंपरा आणी अन्याया विरुद्ध त्यांनी दंड थोपटले,ते लढले आणी त्यांनी त्यांचे लढे यशस्वी केले.
डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनिती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जाती भेदाभेद या सारख्या चुकीच्या आणी अन्याय कारक प्रथा परंपरेला छेद देणारा निर्णायक लढा देऊन मानवतेच्या कल्याणाचा नवा इतिहास रचला. त्यांच्यामुळेच या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क मिळाला. समाजातील गरीब, उपेक्षित, वंचित, दुर्बल घटकातील बांधवांना समानतेचा हक्क त्यांनी मिळवून दिला आणी त्यांना स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. “शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा” हा नारा किंवा फकत एक वैचारिक संदेश देऊन ते थांबले नाहीत तर त्याला स्वतःच्या कृतीची जोड देत त्यांनी देशाला उन्नतीचा मार्ग दिला. ‘ “शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे जो पिणार तो अन्याया विरुद्ध गुरगुरणार “त्यांच्या याच संदेशानं महिला आणि दलित बहुजनांच्या कित्येक पिढ्या शिकल्या त्यांचा उद्धार झाला त्यांचं कल्याण झालं. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी न्याय हक्का साठी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक योगदान देणाऱ्या संघटना निर्माण केल्या. या द्वारे एकजुटीने संघर्ष करण्याची हिम्मत आणि ताकद दिली. अनेक प्रकारचे समाजाच्या हिताचे कायदे करून
डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं भारताला सामाजिक,राजकीय, आर्थिक आणी सांस्कृतिक क्षेत्रात एक मजबूत राष्ट्र बनवले. देशाचे सार्वभोमत्व, एकता, अखंडता आबादीत ठेवण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र्य आणी समानता याला प्राधान्य दिले. मानवता हा धर्म आणी बंधुभाव हीच पूजा आशा सूत्राने भारताला एकत्र जोडून ठेवण्याचे आणी भारत एकसंध राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात रहाते.
डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला मताचा सामान अधिकार दिला. कामात स्त्री पुरुष असा लिंग भेद न करता सामान वेतन हा कायदा केला. कुणी कोणतेही काम करू शकतो तसे करण्याचे स्वातंत्र त्यांना बहाल केले. प्रत्येक देशवासियाला मानानं आणी स्वाभिमानानं जगण्याचा हक्क प्रदान केला. देशातील सर्व जनतेला विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याचा ध्यास घेणारे डॉ. बाबासाहेब हे महान युगपुरुष होते. असे हे
ते दूरदृष्टीचे नेते होते, उच्च कोटीचे कायदेतज्ञ, अर्थतज्ञ, लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. महिलांच्या हक्कासाठी चा कायदा म्हणजे हिंदु कोडबील लागू करण्याची आवशकता अधोरेखित करून त्यांच्या हक्का साठी मंत्रिपदाचा राजीनामा देणारे ते एकमेवाद्वितीय कायदे मंत्री आहेत. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे देशाच्या आर्थिक सुधारणांच्या बाबतीत त्यांनी घेतलेले धोरणत्मक पाऊल होते .
त्यांच्या जीवन पटलावर एक दृष्टिक्षेप टाकला तर त्यांच्या महान कार्याचा अभिमान वाटतो. स्वातंत्र्या नंतर पण त्यांना या भारत देशात मानवतेचा संदेश देणारे, मानवी हक्का साठी अनेक क्रांतिकारक लढे लढावे लागले. त्यांनी सर्वसमावेशक कल्यानाचे जे लढे लढले त्यात सार्वजनिक पाणवठ्यावर सर्वांना पाणी पिण्याचा अधिकार पाहिजे म्हणुन केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, धार्मिक संस्कृती च्या नावाखाली महिलांना गुलाम बनविणारी कायदे व्यवस्था म्हणुन जपली जाणारी मनुस्मृती आणी त्यातील कायदे नाकारून महिलांच्या मुक्ती साठी मनुस्मृती दहनाचं केलेलं आंदोलन , बहुजनांना मिळवून दिलेला काळाराम मंदिर प्रवेश, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी दिलेले लढे, हे सारं देशातील बंधुभाव एकत्रीत ठेवण्या साठी केलेले महान कार्य देश विसरू शकत नाही.
जसे संविधानाच्या माध्यमातून त्यांनी देशाला राजकारण, समाजकारण, आणी अर्थकारण आणी शैक्षणिक धोरण देऊन आश्वासक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं तसेच त्यांनी मानवाला मानवता प्रदान करणारा विज्ञानवादी “बौद्ध धम्म” स्वीकारून त्यांचे विचार कार्य देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांती चा संदेश देणारे आहे असा मार्ग दाखवून दिला. बौद्ध धम्म वैश्विक धम्म असुन तो फक्त भारतातील कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नसून अखिल मानवजातीच्या कल्याणाचा मार्ग सुखकर करणारा जीवन प्रवास आहे हे अधोरेखित केले.
डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि आचरण करून आपण सर्व जण त्यांचा जयंती दिन उत्साहात आणि समर्पित भावनेने साजरा करु या.
डॉ. बाबासाहेबा आंबेडकर यांचे गुरु बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले होते त्यांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं महत्वाचं आहे त्यांचा कित्ता गिरवत समाजातील सर्व स्तरातील देशवासियांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास व्हावा हा ध्यास उराशी बाळगून त्यांनी कार्य केले. आपण ही डॉ. बाबासाहेबांना आपले खरे गुरु मानून त्यांनी निर्माण केलेल्या वाटेने वाटचाल करू या.
त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे कृतज्ञतापूर्वक स्मरण आणि आचरण करून वाटचाल करु या !
डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! *-डॉ. उज्वला जाधव, 9892491491 (लेखिका या मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष रोजगार आणि स्वयं रोजगार विभाग, मुंबई विद्यापीठाच्या सेवानिवृत्त जीवशास्त्र विभाग प्रमुख आहेत.)*
——–०००००००——-