मुंबई : दिशा सालीयान प्रकरणातील एक महत्त्वाची पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघात पार पडली. या पत्रकार परिषदेत ॲड. चंद्रशेखर शिंदे यांनी दिशा सालीयानचे वडील यांचे वकील ॲड. निलेश ओझा व त्यांचे सहकारी रशिद खान पठाण यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा पर्दाफाश केला.
त्यांनी दिलेल्या पुराव्यानिशी ओझा व पठाण यांच्यावर विविध फौजदारी प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये मानवी हक्क आयोगाने निलेश ओझावर वकिली व्यवसायातून कायमची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले होते. सुप्रीम कोर्टानेही दोघांना अवमानाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
तथापि, पोलीस प्रशासन व बार कौन्सिलने आजतागायत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. उलट, वकील असल्यामुळे पोलीस अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला.
या निष्क्रीयतेचा परिणाम म्हणून अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयात ओझावर अवमानाची नवी फौजदारी कार्यवाही सुरु झाली आहे. यामुळेच हे प्रकरण जनतेसमोर आणण्याची वेळ आली असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.