Sunday, December 15, 2024
घरमहाराष्ट्रकोल्हापूरबेळगावी रिट्झच्या प्रांगणालापुलं अन रावसाहेबांच्या आठवणींचा दरवळ… ! -निलेश मदाने, मुंबई

बेळगावी रिट्झच्या प्रांगणालापुलं अन रावसाहेबांच्या आठवणींचा दरवळ… ! -निलेश मदाने, मुंबई

विशेष लेख – ‘पुलं’नी व्यक्तिचित्रणातून अजरामर केलेले ‘रावसाहेब’ लहानपणी आणि आताही कितीदा वाचले, ऐकले तरी त्यातील अद्भूत आकर्षण कमी न होता वाढतच जाते. बेळगावात प्राध्यापकीच्या निमित्ताने आनंदयात्री ‘पुलं’ आणि सुनीताबाईंनी तंबू टाकला आणि कलासक्त रावसाहेब हरिहर यांच्या स्नेहबंधनात ते जखडले गेले. रावसाहेबांच्या मालकीचं ते रिट्झ थिएटर, खाजगी मैफलीसाठीची ती खास खोली, थिएटर ऑफिस जवळील मोकळ्या छोट्या बोळीत संध्याकाळी खुर्च्या टाकून गप्पाष्टकांचा रंगणारा रावसाहेबांचा तो अड्डा ज्यात बेळगावचे कलेक्टर देखील सामील होत आणि “बेळगावची हवा म्हणजे तिथल्या लोण्यासारखीच आल्हाददायक” ची प्रचिती देणारी पंखा सुरू केल्याप्रमाणे या बोळकांडीतून उन्हाळ्यात देखील संध्याकाळी येणारी ती थंड वाऱ्याची झुळुक…हे सारं केव्हातरी बेळगावी जाऊन प्रत्यक्षात अनुभवू ही ‘रावसाहेब’ ऐकतांना प्रत्येकवेळी मनाशी बांधलेली खूणगाठ…रिट्झ टॉकीजचे आता झालेलं ‘लोकमान्य रंगमंदिर’ या जुन्या स्मृतींना अभिमानाने केवळ सांभाळीत नव्हे तर मिरवीत देखील आहे, हे बघितल्यावर रावसाहेबांनी वडिलांच्या श्रीमंतीवर उदक सोडून आनंदाने स्वीकारलेली खुषीची कलासक्त फकिरी किती लाखमोलाची होती ते समजतं!… बेळगावची ही पहिली भेट काही क्षणांची असली तरी ती आता यापुढे चिरंतन आनंदाचा ठेवा ठरणार आहे.

…जवळच्या वकील मित्राचा परवा रात्री फोन आला… दोन दिवस सुटी टाकून बरोबर याल का? बेळगावजवळील बाळेकुंद्री येथे श्रद्धेय पंतमहाराज आणि श्रीदत्त गुरू देवस्थानला दर्शनासाठी जाऊन येऊ… मी होकार देईपर्यंत रेल्वेची तिकीटेही काढली गेली आणि कुठल्याशा अनामिक ओढीने श्री पंतमहाराजांच्या दरबारात मुक्कामी हजेरी लागली. उंच उंच आम्रवृक्षांची शीतल छाया, नीरव शांतता आणि तेथे सुरू असलेली त्रिकाल आरती-नित्य अभिषेक अखंड नामस्मरण यामुळे चित्तवृत्ती प्रसन्न झाली. परतण्यासाठी बेळगावहून दुसऱ्या दिवशी संध्याकाळची रेल्वे असल्याने दुपारी रिट्झ भेटीची ही संधीही साधली गेली.

बाळकुंद्री येथून निघतांना देवस्थानचे श्री. प्रकाश जोशीकाका यांना बेळगाव,’ पुलं’ चे येथील वास्तव्य,रावसाहेब हरिहर, त्यांचे रिट्झ थिएटर, आर्ट सर्कल यासंदर्भात विचारले असता त्यांनी रिट्झचे आता ‘लोकमान्य रंगमंदिर’ झाले असल्याचे सांगितले. स्थानिक रिक्षाचालकाला बोलावून घेत त्याला बेळगाव स्टेशनवर आम्हाला सोडण्या अगोदर पंतवाडा, किल्ला, कमल जैन मंदिर, स्वामी विवेकानंद स्मारक बघून झाले की, लोकमान्य रंगमंदिर येथे घेऊन जा अशी सूचना केली. त्यांचा रिक्षाचालकाशी कानडीत संवाद सुरू असतांना आम्हाला त्यातील रिटझ थेटराsss, पीएल देशपांडे sss , रावसाहेब हरिहरा sss या नावांव्यतिरिक्त काहीही कळले नाही. “बेळगावची हवा तिथल्या लोण्याइतकीच आल्हाददायक!”… हे ‘पुलं’चं वाक्य जोशींकाकांना ऐकवताच, हो हे अजूनही खरं आहे, असे सांगत त्यांनी बेळगावी कुंदा आणि पेढे आठवणीने घेऊन जायला सांगितले.

…रिक्षा ‘लोकमान्य रंगमंदिरा’च्या गेटसमोर उभी राहिली. मी आणि वकील मित्र मध्ये आलो. ऑफिस वजा बंगलीसमोर खुर्च्या मांडून गप्पांच्या मैफलीत रमलेले रावसाहेब, पुलं यांना आतुरतेने नजर शोधत असतांनाच रंगमंदिराचे कर्मचारी सॅम्युएल यांच्याशी गाठ पडली. वो रावसाहेब…असं नुसतं म्हणताच, हैं ना…चलो अंदर… उनका फोटो लगा है…असं म्हणत त्यांनी आतील प्रवेशद्वारावरील रावसाहेबांचा फोटो दाखवला. ‘पुलं’नी वर्णन केलेली ही वल्ली फोटोत असली तरी मला मात्र त्या वातावरणात ती प्रत्यक्षच भेटल्याचा भास झाला. आणखी थोडावेळ फोटोपुढे उभे राहिलो असतो तर त्या सॅम्युएलला- अरे ए… इतक्या लांबून आलेल्या गेष्टला असं उभं ठेवतोस काय रे…शिंचाsss तुझ्या आयबापानं काय शिकवलं नाय का रे sss वर घेऊन जा की रं त्यांना…पीएल आणि ते राम गबाले यांनी “दुधभात” पिच्चरची स्टोरी आन गाणी लिहिली ती खोली दाखिव की रे त्यांना…शिंदडीच्या, नुसता उभा काय रे तुझ्या×××…××× …आणि खरंच, वो रावसाहेब की स्पेशल रूम कहा है, जहाँ विलायत खा साब रुके थे? असं विचारताच …. हा,हा है ना!चलो मेरे पिछे… असे म्हणत सॅम्युएलने वरच्या मजल्यावर नेत त्या विशेष अतिथी खोलीची भेट घडवून आणली. या खोलीच्या भिंती उत्तररात्रीपर्यंतच्या अनेक मैफिली, गप्पाष्टकं आणि हास्यविनोद यांच्या साक्षीदार राहिल्या आहेत.’दुधभात’ ची पटकथा आणि गीतं या खोलीत कागदावर उतरत असतांना लेखकद्वय आणि रावसाहेब यांच्यातील संवाद, भटजीच्या मुलीला लेडी सितारिस्ट करा हा रावसाहेबांचा अजब आग्रह हे सारं ‘पुलं’च्या कॅसेटमध्ये ऐकतांना अजूनही प्रत्यकवेळी हसू आवरत नाही… नव्या मालकांनी या खास खोलीचा हा जुना ठेवा कल्पकतेने जपून ठेवल्याबद्दल समस्त मराठी रसिकांतर्फे त्यांना मानाचा त्रिवार मुजरा…

तेव्हाच्या खानेसुमारीत रावसाहेबांनी आपली भाषा ‘कानडी’ ऐवजी ‘मराठी’ असं लिहून दिलं. कोणीतरी त्यांना या विषयावर हटकल्यावर त्यांचे – “मराठी -कानडी वाद जाऊ दे की रं तिकडं××× याच्यात… चांगलं नाटक आणि गाण्याचं बघ की रं जरा… ज्या भाषेतील नाटक बघायला लोकं गर्दी करतात ती त्या गावची भाषा की रं!”… हे वाक्य कानात घुमताच मी सॅम्युएलला छेडलं…- यहा अभी कौनसा मराठी नाटक या प्रोग्राम होनेवाला है…लोग आते है क्या देखने…?

  • साब, कलही ये शो हो गया… पुरा का पुरा हाऊसफुल था! सॅम्युएलने बोट दाखवलं त्या दिशेने बघितलं. “एका लग्नाची पुढची गोष्ट”च्या जाहिरात फलकातून प्रशांत दामले आणि कविता मेढेकर आमच्याकडे सुहास्यवदनाने बघत होते…

-निलेश मदाने, 98691 78494
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments