प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेची सरळसेवा भरती-2025 करिता 30 संवर्गासाठी 620 पदे सरळसेवेने टीसीएसमार्फत भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये औषध निर्माता/ औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची 12 पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांचे भरती प्रमाण व सेवा अर्हता असलेल्या “नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021” ला नगर विकास विभाग, शासन निर्णय दि.30.03.2021 अन्वये शासन मान्यता प्राप्त झाली आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हे सेवा प्रवेश नियम नगर विकास विभाग, शासन राजपत्र दि.09.04.2021 नुसार प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात आलेले आहेत. त्या अनुषंगाने शासन नियमानुसार सरळसेवा 100% प्रमाणानुसार औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी या पदाकरिता (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.फार्म पदवी, (ब) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, (क) मेडिकल स्टोअरचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक अशी अर्हता देण्यात आलेली आहे.
सदर जाहिरातीतील औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विहित अर्हता ही महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या ‘नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021’ यानुसार नमूद करण्यात आलेली आहे याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, तसेच सरळसेवा पदभरतीकरिता इतर संवर्गातील पदाकरिता अर्हता ही शासनाने विहित केल्यानुसार नमूद करण्यात आलेली आहे. असे नवी मुंबई महानगपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.