सातारा(: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या नूतनीकरण निमित्त साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यामध्ये लहान मुलांच्या खेळण्याच्या नोटात बौद्ध स्तूप व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा पायदळी तुडवली गेली आहे. याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने सातारा जिल्हा महासचिव श्री सुहास एकनाथ मोरे व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी. कारण, हिंदुत्ववादी संघटनेच्या व पक्षाच्या माध्यमातून इतर धम्माचा अपमान करण्याची नवीन प्रवृत्ती वाढीस लागलेली आहे. तिला रोखण्यासाठीच आम्ही निषेध करत आहोत. तसेच कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास दिनांक 16 एप्रिल रोजी औद्योगिक वसाहत मुख्यालयात अंधेरी मुंबई या ठिकाणी आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे.
सातारा औद्योगिक वसाहतीमध्ये दिनांक शुक्रवार दिनांक ४ एप्रिल रोजी सातारा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाचे सकाळी 11 वाजता उद्घाघाटन करण्यात आले.यावेळी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांनी सरकारी कार्यालयात फटाके वाजवून शासकीय कार्यालयाची लेखी परवानगी न घेता शासकीय कार्यालयात फटाके वाजवले आहेत. आणि तशी लेखी कबुली दिलेली आहे. याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी सत्तेच्या माध्यमातून दबाव असल्यामुळे त्याने वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना दमदाटी केली. याचाही रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे. याबाबत जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबईतील अंधेरी या ठिकाणी मुख्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने १६ एप्रिल रोजी निदर्शने केले जाणार आहे.
खोट्या नोटा उधळून खोटी समृद्धी दाखवून स्वतःच्याच डोळ्यात धुळफेक करण्याचा हा प्रकार आहे.
सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत ही सुशीक्षित तरुणांसाठी मृगजळ ठरत आहे. बोटावर मोजता येतील इतक्या मोठ्या उद्योगांना फायदा देऊन त्यांनाच प्रोत्साहन देण्याचे काम सरकारी यंत्रणा करीत आहे. नवउद्योजक तयार करण्यासाठी कुठलेही धोरण किंवा वातावरण दिसत नाही. शासकीय कार्यालयात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके वाजवून सत्ता किती प्रभाव टाकू शकते हे दाखवून दिले आहे.
या घटनेची नोंद सरकारी यंत्रणांनी घेऊन त्यावर कठोर कारवाई करावी. अशी संविधान व लोकशाही मानणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने मागणी केली आहे. दरम्यान देशाच्या स्वातंत्र्य पूर्वी व स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी या नावावर राजकीय पक्षाने सत्ता भोगली पण आता सत्ता नसल्यामुळे महात्मा गांधींच्या अवमान प्रकरणी सातारा जिल्ह्यातून एकाही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त न करता सत्ताधाऱ्यांची बाजू समजून घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले आहे. सदर निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाचे मुख्यालय व सातारा जिल्हा अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना पाठविण्यात आले आहे.
___________________________________