Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रसन्मान महाराष्ट्राचा २०२५’—कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम! बीकेसी ग्राउंडवर ३१ मे...

सन्मान महाराष्ट्राचा २०२५’—कर्तृत्वाचा उत्सव, महाराष्ट्राच्या प्रगतीला सलाम! बीकेसी ग्राउंडवर ३१ मे रोजी होणार गौरवसोहळा

मुंबई : महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, क्रीडा, कला, साहित्य, विज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करणारा ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा दैदिप्यमान पुरस्कार सोहळा ३१ मे रोजी वांद्रे येथील एमएमआरडीए ग्राउंडवर संपन्न होणार आहे. अभिनेता, लेखक, वक्ता शरद पोंक्षे यांनी या सोहळ्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता प्राप्त ‘अर्थ’ या सामाजिक संस्थेतर्फे आयोजित हा पुरस्कार सोहळा तिसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रांतील १२ कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षीसुद्धा अशा व्यक्तींना गौरवण्यात येणार आहे ज्यांचे कार्य प्रभावी आणि उल्लेखनीय असले तरी प्रसिद्धीझोतात आलेले नाही.

यंदाच्या सोहळ्याचे सूत्रसंचालन शरद पोंक्षे यांच्यासह छोटया पडद्यावरील हरहुन्नरी कलाकार गौरव मोरे करणार असून, पुरस्कार वितरणासह संगीत-नृत्याने नटलेले भव्य सादरीकरणही होणार आहे. हा सोहळा महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि उज्वल भविष्य यांचा संगम असणार आहे. हा सोहळा सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये या सोहळ्याला मोठा प्रतिसाद लाभला असून, यापूर्वी पद्मश्री दादा इदाते (सामाजिक), पद्मश्री गिरीश प्रभुणे (शैक्षणिक), पद्मश्री राहीबाई पोपेरे (कृषी), श्री प्रवीण दीक्षित (मा.पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य), महेश झगडे (आरोग्य), डॉ. पंकज चतुर्वेदी (आरोग्य), श्री इंद्रनील चितळे (चितळे बंधू), महेश कोठारे, आकाश ठोसर, दिग्पाल लांजेकर (सांस्कृतिक आणि मनोरंजन) यांसारख्या मान्यवरांना या मंचावर गौरवण्यात आले आहे.

‘अर्थ’ संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रवीण कलमे, तसेच सीईओ प्रविणा कलमे म्हणतात, “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या, पण प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यंदाही साहित्य, कला, क्रीडा, विज्ञान, आरोग्य, संरक्षण, कृषी अशा विविध क्षेत्रांतील अशा प्रतिभावान व्यक्तींना प्रकाशझोतात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

यावर्षीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील असे काही मान्यवर सन्मानित होणार आहेत, ज्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असूनही ते अद्याप व्यापक स्तरावर पोहोचलेले नाही.

“आपल्या ओळखीतील अशी व्यक्ती जिचे कार्य महाराष्ट्राच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देते, पण ज्याला अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली नाही, अशा व्यक्तींची माहिती आम्हाला कळवावी. आमची निवड समिती त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करून पुरस्कारांसाठी निवड करेल, असे प्रविणा कलमे म्हणाल्या.

*संयुक्त राष्ट्रसंघ मान्यताप्राप्त ‘अर्थ’ संस्थेचा पुढाकार*

२०१५ पासून कार्यरत असलेल्या ‘अर्थ’ संस्थेला २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची (UN) मान्यता मिळाली आहे. ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर कार्यरत असून, समाजात आणि व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवण्यासाठी कटिबद्ध आहे.

‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा सोहळा महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या सन्मानाचा सोहळा असणार आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा सन्मान करणारा भव्य दिव्य दिमाखदार सोहळा उपस्थित राहून अनुभवण्यासाठी आपली जागा +९१ ८४९६९ ८४९६९ या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करून आरक्षित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments