Tuesday, August 26, 2025
घरमहाराष्ट्रप्रतिकूलतेचे खत करून बाबासाहेबांनी समतेच्या विचारांचे अमृतरोप फुलविले – प्रा.प्रवीण दवणे

प्रतिकूलतेचे खत करून बाबासाहेबांनी समतेच्या विचारांचे अमृतरोप फुलविले – प्रा.प्रवीण दवणे

प्रतिनिधी : आयुष्यात आलेल्या नकाराला जिद्दीचा होकार भरणारे व संकटाचे खत करुन त्यातून समग्र समाजाचा विचार करुन अमृताचे रोप फुलविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही भारताची पुण्याई असल्याचे सांगत सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी बाबासाहेबांचे आभाळाएवढे व्यक्तीमत्व बालपणापासून कसे घडत गेले हे विविध प्रसंग कथन करीत प्रभावीपणे मांडले.

बाबासाहेबांचे उत्तुंग कर्तृत्व आपण जाणतोच, पण त्यांचे युवक म्हणून घडणे आणि देशातील युवक घडण्यासाठी त्यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन हे सूत्र पकडून ‘युवकांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर प्रा. प्रवीण दवणे यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर’ व्याख्यानमालेत उपस्थितांशी हृदयसंवाद साधला.

यामध्ये त्यांनी बाबासाहेबांचे लहानपणापासूनचे प्रतिकूल परिस्थितीशी झुंजा देत घडत जाणे छोटया छोटया गोष्टींतून सांगितले. शब्द सापडण्याआधी त्यांना समाजातील जळती प्रश्नचिन्हे सापडली आणि त्याची उत्तरे शोधता शोधता ग्रंथांच्या वाचनातून मिळालेल्या ज्ञानातून व देशातील तसेच परदेशातील वातावरणाचा अनुभव घेऊन ते घडत गेले. शिक्षणाचा ध्यास घेत, प्रचंड प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी ध्येयपूर्तीच्या दिशेने निग्रहाने वाटचाल केली. अभावातला भाव माणूस घडवितो हे बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहिल्यानंतर लक्षात येते. पोकळीचे पंख करतात ते असामान्य होतात अशा शब्दात बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा गौरव करीत प्रा. प्रवीण दवणे यांनी आपल्या तरुणाईला सगळे हातात देण्याऐवजी संघर्ष करुन मिळविण्याची सवय लागू द्या असा संदेशही उपस्थितांना दिला.

देशाचे भविष्य असणा-या युवकांकडून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना फार मोठया अपेक्षा होत्या त्यादृष्टीने त्यांनी वेळोवेळी युवकांशी संवादही साधला. ‘विद्यार्थ्यांनो जागृत व्हावे’ या त्यांच्या सर्वश्रुत व्याख्यानाप्रमाणेच त्यांनी अनेकदा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 13 वर्षे अध्यापनही केले. समर्थ विद्यार्थी घडविण्यासाठी सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली. ‘प्राध्यापक केवळ विद्वान नकोत तर बहुश्रृत पाहिजेत’ हे कसोशीने पाहिले. ‘पंचेद्रियांना साक्षी ठेवून सत्य शोधा’, ‘जीवनाला प्रयोगशाळा माना’ – अशा अनेक विधानांमधून बाबासाहेबांनी युवकांना मार्गदर्शन केले.

बालपणापासून प्रचंड प्रतिकूलता अनुभवूनही बाबासाहेबांनी समानतेचा विचार केला. कारण त्यांच्या विचारात व कार्यात सूडाची भावना तिळमात्र नाही तर त्यांच्या आक्रमतेला करुणेचे हृदय आहे अशा शब्दात प्रा. प्रवीण दवणे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वसमावेशक विचार प्रणालीचा गौरव केला.

बालपणापासून पुस्तके हाती देणारे व पुस्तके वाचतो की नाही यावर लक्ष ठेवणारे वडील त्यांना लाभले. सैन्यात असणा-या वडीलांकडून धैर्य, शौर्य, समर्पणाचा वारसा त्यांना लाभला. निरीक्षणाच्या वाटेने संवेदनांच्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले आणि प्रश्नसमृध्द बालपणातून उत्तरे शोधता शोधता ते घडत गेले हे विविध प्रसंग, उदाहरणे यामधून उलगडवत ‘जे काम कराल ते राष्ट्रकार्य म्हणून करा’ – हा बाबासाहेबांनी दिलेला संदेश तंतोतंत अंगीकारणे म्हणजे त्यांना मनापासून अभिवादन करणे असल्याचे प्रा. प्रवीण दवणे यांनी निग्रहाने सांगितले.

अत्यंत ओघवत्या शैलीत बालपणापासूनचे बाबासाहेबांचे जीवन प्रा. प्रवीण दवणे उलगडवून सांगत असताना उपस्थित श्रोते तल्लीन होऊन गेले होते. या व्याख्यानातून बाबासाहेब अधिक सखोल समजले अशा प्रतिक्रिया रसिकांकडून व्यक्त करण्यात आल्या.

‘जागर 2025’ व्याख्यानमालेत यापुढे रविवार, दि. 06 एप्रिल 2025 रोजी सायं. 6.30 वाजता, सुप्रसिध्द कवी श्री. अरुण म्हात्रे ‘प्रिय भिमास…’ हा कविता व गीतांचा कार्यक्रम सादर करणार असून यामध्ये श्री. गंधार जाधव व श्रीम. गाथा आयगोळे हे गायक सहभागी होणार आहेत. तरी या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments