सातारा(अजित जगताप) : सातारा औद्योगिक वसाहतीच्या प्रादेशिक कार्यालयात काल उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी व साची स्तूप चित्र असलेल्या खोट्या नोटा उडवल्याची धक्कादायक बातमी प्रसारित झाली . या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असतानाच आता प्रादेशिक कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्या पडल्याने डबल धमाका निदर्शनास आला आहे.
सातारा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातील नूतनीकरणाच्या कार्यक्रमाच्या भोंगळ कारभार जनतेसमोर आणला . ह्या खोट्या नोटा शिवसेना शिंदे गटा कडून उडवण्यात आल्याची माहिती शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांनी फोनद्वारे दिली. परंतु या फटाक्यामध्ये काय होतं याबाबत ते अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर बातमीच्या पाठपुराव्यासाठी याच कार्यालयात कचरा व काल उडवण्यात आलेल्या लहान मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा जाळल्या जात असल्याची गोपनीय माहिती समोर आलेली आहे.
कार्यालयाच्या एका बाजूला चक्क दोनशे रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील खोट्या नोटा व कचरा जाळल्या जात होत्या, तर दुसरीकडे काचेच्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेला होत्या. मंत्री महोदयांच्या कार्यक्रमातही त्या उचलून बाजूला करण्याचे सौजन्य दाखवले नाही.या बाबत नवल व्यक्त केले जात आहे.
शासकीय कार्यालयाच्या आवारात दिवसा ढवळ्या रिकाम्या दारूच्या बाटल्या सापडल्याने अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. संबंधित प्रादेशिक कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरुवातीला कोणतेही अधिकारी कॅमेऱ्यासमोर येण्यास तयार नव्हते. सत्य जनतेसमोर आणण्याचा निर्धार करत स्थानिक लोकवृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये थेट कॅमेरा सुरू केला आणि प्रादेशिक अधिकारी श्री अमित सनगरसाहेब यांनी या गंभीर प्रकारावर तात्काळ प्रतिक्रिया देण्याचे टाळले, मात्र सततच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यांनीही पत्रकारांची बेकायदेशीर चित्रीकरण केल्यामुळे त्यांना प्रोटोकॉल सांगण्याची गरज वाटू लागलेली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे उद्योग मंत्री डॉ उदय सामंत काय भूमिका घेतात ? शासकीय कार्यालयात मंत्र्याच्या स्वागतासाठी फटाके व बनावट नोटा उडवले गेले. त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शासकीय कार्यालयात अशा प्रकारे खोट्या नोटा जाळणे आणि रिकाम्या दारूच्या बाटल्या फेकून देणे. हे अत्यंत गंभीर आणि निंदनीय आहे. ‘लोकवृत्त’ने हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे प्रशासनातील गैरकारभार चव्हाट्यावर आला आहे. या प्रकरणी तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान शासकीय कार्यालयात मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके पुरवले कितपत योग्य आहे याचा आता सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खुलासा करावा अशी मागणी पुढे येऊ लागलेली आहे.
_______________________________________________
फोटो सातारा औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाच्या आवारातील रिकाम्या बाटल्या
____________________________________