ठाणे : गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेले ठाणे पालिकेचे फेरीवाला धोरणाला अखेर मुहूर्त मिळणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत फेरीवाला समितीच्या निवडणुकीची दिशा निश्चित करण्यात आली असून येत्या दोन ते तीन दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. नंतर एप्रिल महिन्यात फेरीवाला धोरण जवळपास निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात असून यामुळे बेकायदा फेरीवाल्यांना चाप लागणार आहे. ठाणे महापालिका हद्दीत रस्त्यावर बसणाऱ्या बेकायदा फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पालिकेकडून अशा फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असली तरी देखील फेरीवाल्यांची संख्या कमी होतांना दिसत आहे. २०१९ मध्ये प्रशासनाने सर्वेक्षण करून शहरात ६ हजार फेरीवाले असल्याचे जाहीर केले. यामध्ये केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा प्रशासनाने केला. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करतांना फेरीवाल्यांची संख्या १ हजार ३६५ एवढी निश्चित झाली आहे.सध्या ३० जणांची कमिटी फेरीवाल्यांची आहे. नव्याने पुन्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षणनव्या कमिटीची निवडणूक घेण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणुकीची दिशा ठरविण्यात आली आहे. त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम प्रत्यक्षात जाहीर केला जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार पुढील महिन्यात फेरीवाला धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता नव्याने पुन्हा फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. त्यामुळे आधीच्या तुलनेत फेरीवाल्यांची संख्या वाढणार असल्याचेच यावरुन दिसत आहे. तसेच जागांचा देखील नव्याने सर्व्हे केला जाणार असून त्यानुसार फेरीवाल्यांच्या जागा देखील निश्चित केल्या जातील, अशी माहिती देखील महापालिकेने दिली.
ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरणाला एप्रिलचा मुहूर्त
RELATED ARTICLES