प्रतिनिधी : काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी शिंदे गटाचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांच्यावर टीका केली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी थेट राहुल शेवाळे यांच्यावर निशाणा साधला आहे. मला वाटतं राहुल शेवाळेंचे मोठे व्हिडीओ आहेत. तेही बाहेर आले पाहिजे. शेवाळे चेंबूरला बाबासाहेबांचं दर्शन घ्यायला गेले होते. तेव्हा लोकांनी काय केलं? ते व्हिडीओ बाहेर आले पाहिजे. त्यांचे दुबईतील व्हिडीओ फारच प्रसिद्ध आहेत. तेही बाहेर आले पाहिजे, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
मिलिंद देवरा यांचं ट्विट काँग्रेसबद्दल नाहीये. काँग्रेस दलित विरोधी असता तर त्यांनी मला अध्यक्ष केलं असतं का? एका महिलेला मुंबईची अध्यक्षा केलं असतं का? आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित आहेत. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षावर बोलू नये. त्यांच्या पक्षावर बोलावं. मुंबईतील तुमचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत, ते पाहा. एकनाथ शिंदे निवडणुकीनंतर राहणार की नाही ते पाहावं. त्यांनी त्याचा विचार करावा, असा टोलाही वर्षा गायकवाड यांनी लगावला.
मिलिंद देवरा आता जे बोलत आहेत, ते काँग्रेसमध्ये असताना का बोलले नाही? कोणत्याही आघाड्या मुद्द्यावर होतात. आमची आघाडी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर झाली आहे. मिलिंद देवरा यांनी आता मोदींनी काय काम केलं ते सांगावं? या सरकारच्या कामावर बोलावं. 50 खोक्यावर बोलावं. महापालिकेतील निधीचं वाटप कसं केलं ते सांगावं. मुंबईसाठी केंद्र सरकारने काय दिलं ते सांगावं. महापालिकेचा 1 लाख कोटीचा निधी कुठे गेला? यावर उत्तर द्यावं. मुंबईचे इव्हेंट बाहेर नेण्याचं काम केलं, त्यावर बोलावं, असा हल्लाच त्यांनी चढवला. महागाई बेरोजगारीचं काय झालं? त्यांनी मुलभूत विषयावर बोलावं ना ? इकडच्या तिकडच्या प्रश्नावर बोलण्याची भाजपची सवयच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.