प्रतिनिधी : रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आपल्या रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या खास शैलीत सदाभाऊ विरोधकांचा समाचार घेतात. दु:ख, वेदना मांडतानाही आपल्या खास आणि खुमासदार शैलीत ते असं काही सांगून जातात की हसता हसता मनाला चटका लागतो. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशावेळी सदाभाऊ यांच्या भाषणाची चर्चा होणार नाही तर नवलच. सदाभाऊंनी आपल्या खुमासदार शैलीत कोल्हापुरात भाषण केलं. मंत्रीपद गेल्यानंतरचं दु:खं काय असतं हे सदाभाऊंनी बेमालूमपणे मांडले. मंत्री होतो तवा जेवायला बोलवायचे. आग्रहावर आग्रह करायचे. आता चहा बी पाजत नाहीत, असे सदाभाऊ खोत यांनी म्हणताच अनेकांना हसू आवरेना झाले. पण हसता हसता डोळ्याच्या कडाही पाणवल्या.
माजी मंत्री सदाभाऊ खोत कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. बोलण्यात हायगय करायची नाही मी ही बोलतच होतो. हातकणंगले मीच लढवणार, पण मी नाही म्हणलं तर माणसं माझ्यासोबत राहतील का? लोक मला विचारायचे की भाऊ कसं काय? मी म्हणायचं जमलं. मात्र मला माहीत होतं जमलेलं नाही, असं सदाभाऊ खोत यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
मंत्रीपद गेलं, गाडी गेली अन्……
सत्ता लय वाईट असते. मी भोगली आहे. माझी गाडी आली आणि हॉर्न वाजायला लागला की मागून दहा गाड्या यायच्या. प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर रांगा लागायच्या. मला वाटायचं आपलं वजन वाढायला लागलंय. मंत्रीपद गेलं आणि गडी बी गेली आणि गाडीवालाही गेला. मी एकटाच राहिलो, असं सदाभाऊ यांनी म्हणताच पुन्हा एकदा हशा पिकला.
आधी मला एक एक वाजेपर्यंत फोन करायचे. मी उचलायचं. मात्र आता मी फोन केला तर गडी फोन उचलत नाही. मंत्रीपद गेल्यानंतर एकाही खासदाराने मी खुर्ची टाकून बसलेले असताना काच सुद्धा खाली केली नाही. मी मंत्री असताना घरी आले की मी त्यांना सोलापुरी भाकरी, ठेचा, शेंगा चटणी द्यायचो. गडी खाताना म्हणायचा मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही. खाणारा गडी खाऊन खाऊन थकून जायचा. मात्र मी सांगायचं त्यांना खाऊ घाला, थोडे कामाला येतात. मात्र आता कुठे कोण आहे? पूर्वी मला जेवायला बोलवायचे. मात्र आता साधा चहा प्यायला हे कोणी बोलवत नाही, असेही ते म्हणाले.