धगधगती मुंबई | २३ मार्च २०२५ | नवी मुंबई
नवी मुंबईतील सुप्रसिद्ध सानपाड्याचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या कार्यकर्त्यांसाठी गायत्री टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे एक विशेष धार्मिक व ऐतिहासिक यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेअंतर्गत कार्यकर्त्यांना भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ व शिव मंदिर येथे दर्शनाचा लाभ घेता आला.
हे भव्य मंदिर डॉ. राजाभाऊ चौधरी व शिवक्रांती प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून, भक्ती आणि शक्ती यांचा मिलाप घडवणारे हे स्थान महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
या विशेष यात्रेत गायत्री टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे मालक अजिंक्य शिवणकर, सुप्रसिद्ध कलाकार खाऊबली, धगधगती मुंबई वृत्तपत्राचे प्रतिनिधी ओमकार धुळप, तसेच मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सागर वारुंगसे, सचिव मंदार शेलार, खजिनदार प्रतिक ठाकूर आणि इतर मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गायत्री टूर्स आणि ट्रॅव्हल्सचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. गणेश भक्त आणि छत्रपती शिवरायांचे अनुयायी यांना प्रेरणादायी ठरलेल्या या यात्रेने महाराष्ट्राच्या परंपरेला नवा सन्मान मिळवून दिला.
