Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रजागतिक जलदिनानिमित्त मोरबे धरणासह नवी मुंबई क्षेत्रात ठिकठिकाणी सामुहिक जलशपथ

जागतिक जलदिनानिमित्त मोरबे धरणासह नवी मुंबई क्षेत्रात ठिकठिकाणी सामुहिक जलशपथ


प्रतिनिधी : पाणी ही जीवनावश्यक गोष्ट असून पाण्याला जीवन असेही संबोधले जाते. पिण्यायोग्य पाण्याचे पृथ्वीवरील अत्यल्प प्रमाण लक्षात घेऊन उपलब्ध जलस्त्रोतांचे संवर्धन करणे व पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यंत महत्वाचे असल्याचे लक्षात घेत संयुक्त राष्ट्र संघाने 1993 पासून 22 मार्च हा दिवस ‘जागतिक जल दिन’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचे महत्व अधोरेखित करीत जगभरात संपन्न होणा-या यावर्षीच्या जागतिक जलदिनाचा विषय ‘हिमनदी संवर्धन’ हा आहे.

या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक जल दिनाचे औचित्य साधून ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध विभागांमध्ये जलजागृतीविषयक विविध उपक्रम राबविण्यात आले. महानगरपालिकेचे विविध विभागांमध्ये असणारे जलकुंभ तसेच पम्पींग हाऊस त्याचप्रमाणे मोरबे धरण प्रकल्प व भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र याठिकाणी सामुहिक जलशपथ घेण्यात आली. अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे व इतर अभियंते व अधिकारी, कर्मचारी ठिकठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे यावेळी स्थानिक नागरिकांनीही सहभागी होत जलशपथ घेतली.

आपण या वसुंधरेला वाचवू शकतो आणि आपले भविष्य सुरक्षित करु शकतो. यासाठी देशाचा जलरक्षक म्हणून कायम कार्यरत राहण्याची मी शपथ घेत आहे अशा आशयाच्या जल शपथेमध्ये पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच पाण्याचा थेंब अन् थेंब साठवून ‘कॅच द रेन’ या अभियानाच्या यशस्वितेसाठी मी संपूर्ण सहयोग देईन व पाण्याला एक अनमोल संपदा मानून पाण्याचा वापर करेन अशीही शपथ घेण्यात आली. पाण्याचा विवेकी वापर करण्याबाबत व पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत मी, माझे कुटुंबिय व मित्र आणि शेजाऱ्यांना प्रेरीत करेन असेही प्रतिज्ञेत नमूद आहे.

नवी मुंबई हे स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणामुळे जलसमृध्द शहर असले तरी प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला किती पाण्याची गरज आहे हे ओळखून पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन फ्लेक्स बॅनर्स, स्टॅंडीज्, होर्डींग अशा विविध माध्यमांतून जागतिक जलदिनाचे औचित्य साधून महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments