प्रतिनिधी : नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छतेमध्ये देशात नेहमीच मानांकन उंचावत ठेवले असून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरीमुळे ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग’ या नव्याने निर्माण केलेल्या विशेष कॅटेगिरीमध्ये नवी मुंबईसह देशातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
आता ‘स्वच्छ सर्वेक्षण 2024’ ची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे ‘नागरिकांचा प्रतिसाद (Citizen Feedback)’ नोंदविण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे. याकरिता स्वच्छ भारत मिशनमार्फत जाहीर करण्यात आलेल्या पोर्टलवर अर्थात https://sbmurban.org/feedback या लिंकवर क्लिक करून नागरिकांनी शहर स्वच्छतेविषयीचा आपला अभिप्राय वेबसाईटवर नोंदवायचा आहे.
यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलवरून नवी मुंबई शहराच्या देशातील सर्वोच्च मानांकनासाठी सर्वेक्षणात विचारल्या जाणा-या 10 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे देऊन आपल्या नवी मुंबई शहराचे मानांकन उंचवावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रतिसाद नोंदविण्यासाठी नागरिकांपर्यंत वेबसाईटची लिंक तसेच क्यू आर कोड विविध माध्यमांचा वापर करून पोहचविण्यात येत आहे.
याकरिता ठिकठिकाणी फलक लावून तसेच स्टँडी ठेवून क्यू आर कोड प्रदर्शित करण्यात आले असून चित्रपटगृहांमध्येही क्यूआर कोडची व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यात आली आहे. याशिवाय नाट्यगृह तसेच सिग्नलवर ध्वनिक्षेपकाद्वारे नागरिकांनी अभिप्राय नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.
शाळांमध्येही विद्यार्थ्यांद्वारे पालकांना आवाहन करण्यात आले असून महाविद्यालये व शैक्षणिक संस्था येथे जाऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अभिप्राय नोंदविण्यावर भर दिला जात आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांचे अभिप्राय नोंदवण्यासाठीही विशेष पथके कार्यरत आहेत.
विशेषत्वाने शनिवार व रविवार नागरिकांना सुट्टी असते हे लक्षात घेऊन ही पथके अधिक प्रभावीपणे काम करीत असून मॉल्स तसेच वंडर्स पार्क, रॉक गार्डन, ज्वेल ऑफ नवी मुंबई यासारखी गर्दीची उद्याने तसेच विविध उत्सव साजरे होतात अशी ठिकाणे येथेही ही पदके जाऊन नागरिकांना प्रतिसाद नोंदवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत.
नवी मुंबई शहराचे मानांकन उंचावण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद ही एक महत्वाची बाब असून जागरूक नागरिकांकडून प्रतिसाद नोंदवण्यासाठी उत्तम सहकार्य लाभत आहे.
आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी सर्वेक्षणाच्या गुणांकनात प्रत्येक नवी मुंबई नागरिकाने एक सामाजिक जबाबदारी म्हणून नागरिकांचा प्रतिसाद (Citizen Feedback) अंतर्गत https://sbmurban.org/feedback लिंकवर अथवा क्यू आर कोडवरून 10 प्रश्नांची सर्वोत्तम उत्तरे नोंदवावीत तसेच आपले कुटुंबिय, मित्र – परिवार, कार्यालयीन सहकारी यांनाही अभिप्राय नोंदविण्यास सांगावे व प्रोत्साहीत करावे तसेच प्रतिसाद नोंदविण्यासाठी आपल्याशी संपर्क साधणा-या नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रतिनिधींस संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.