बावधन(अजित जगताप) : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये सातारा जिल्ह्यातील बावधन तालुका वाई येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ बगाड यात्रा आज मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली.
बावधन गावापासून पूर्वेला चार किलोमीटर अंतरावर सोमेश्वर या ठिकाणाहून मोठ्या भक्ती भावाने बगाडाला प्रारंभ झाला. श्री काळ भैरवनाथ बगाड रथ हा सोमेश्वर इथून बावधून पर्यंत बैलांच्या साह्याने आणला गेला. हा रथ मार्गावरील शेतातून तसेच रस्त्यातून येत असल्याने दुतर्फी भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती. या यात्रेकरूंसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची मार्गावर व्यवस्था केली परंतु, मोठ्या प्रमाणात यात्रेकरू जमल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फी वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. त्याचबरोबर अनेकांनी रस्त्याच्या आजूबाजूला वाहने लावून बगाडाच्या दिशेने धाव घेतल्यामुळे अनेकांना अडचणी निर्माण झाल्या. वास्तविक पाहता या यात्रेमध्ये वाहनांची संख्या व वाहनतळाची सुविधा यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे अगदी वाई हद्द ते कडेगाव पर्यंत भाविकांना चालत जावे लागत होते.
यात्रेकरूंना उन्हाच्या तीव्रतेने किंवा गर्दीमध्ये वाट काढत असताना खूप त्रास सहन करावा लागला. दरवर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने बगाड मार्गाची पाहणी करून अधिकारी वर्ग नियोजन करतात. पण, हे नियोजन कागदावरच राहत असल्यामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांना व धार्मिक यात्रेसाठी आलेल्या यात्रे करून द अनेक सण साजरे करताना असाच त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फी खाद्यपदार्थ, खेळणी व पारंपारिक व धार्मिक साहित्याची विक्री होत असल्याने मोठी गर्दी दिसून आली आहे.
बावधनच्या श्री काळभैरवनाथ बगाड पाहण्यासाठी पुणे, मुंबई ,नवी मुंबई, पाचगणी महाबळेश्वर ,महाड, वाई, कोरेगाव, जावळी, सातारा तालुक्यातील भाविक आले होते. अखेर पोलिसांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांना समज दिली. दुपारी वाहन जाण्या येण्याची व्यवस्था केली. तसेच वाई कडून महामार्गावर जाणारी वाहतूक वळवल्यामुळे भाविकांना रस्त्यावरून चालणे सोयीस्कर झाले. काल वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार सोनाली मिटकरी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी श्री काळ भैरवनाथ बगाड यात्रेच्या मार्गावर पाहणी करून सूचना केली होती. आज या सूचनांचे पालन करण्यापूर्वीच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. त्यामुळे बावधनचे बगाड पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागली. अखेर श्री काळभैरवनाथ बागडाच्या दर्शनाने अनेकांना मनस्वी आनंद झाला.
……………………………………
बावधनचे बगाड व भाविकांची झालेली गर्दी (छाया- अजित जगताप, बावधन)
भाविकांच्या गर्दीने बावधनचे बगाड उत्साहात फुलले….
RELATED ARTICLES