Saturday, August 2, 2025
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत तीन महिन्यात ४६ कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत तीन महिन्यात ४६ कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य

मुंबई : राज्यातील गरीब व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ‘जीवनदायी’ ठरत आहे. मागील तीन महिन्यांत मदतीचा आलेख उंचावला असून तब्बल ५,२५० रुग्णांना ४६ कोटी ३७ लाख ५० हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली असल्याची माहिती कक्षप्रमुख श्री. रामेश्वर नाईक यांनी दिली.

राज्यभरातील गरीब रूग्णांसाठी दिवसेंदिवस मदतीचा आलेख उंचावत आहे. यासंदर्भात श्री. नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील आरोग्य क्षेत्राला बळकटी मिळत आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्री सहायता व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरीब रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मोठा आधार मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष अहोरात्र कार्यरत आहे. याचीच फलश्रुती म्हणून डिसेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या तीन महिन्यांत ५ हजार २५० रुग्णांना आर्थिक मदतीचे वितरण मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून करण्यात आले असून, दिवसेंदिवस या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

डिसेंबर २०२४ मध्ये १३९२ रुग्णांना १२ कोटी २१ लाख रुपये, जानेवारी २०२५ मध्ये १७८८ रुग्णांना १५ कोटी ८१ लाख २७ हजार रुपये तर, फेब्रुवारी २०२५ मध्ये २०७३ रुग्णांना १८ कोटी ३४ लाख ६६ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली. ही मदत केवळ आकड्यांपूर्ती मर्यादित नसून अनेक रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांना भरीव आधार मिळत असल्याचे समाधान नातेवाईकांतून व्यक्त होत आहे.

गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा धर्मादाय रुग्णालय मदतीचा लाभ घेण्यासाठी खालील माध्यमांद्वारे संपर्क साधावा असे आवाहन श्री. रामेश्वर नाईक यांनी केले आहे.
हेल्पलाइन नंबरः ९३२११०३१०३
ईमेल: aao.cmrf-mh@gov.in
अधिक माहितीः cmrf.maharashtra.gov.in

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments