प्रतिनिधी : गजबजलेल्या उत्सवप्रिय आपल्या महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमात व्यावसायिक निवेदक किंवा सूत्रसंचालकाची गरज भासते. तो सहज उपलब्ध व्हावा तसेच कामाची आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्दात्त हेतूने विजय कर्जावकर या तरूणाने “कट्टा निवेदकांचा” या नावाचा व्हाॅटसॲप ग्रूप २१ ऑगस्ट, २०१४ रोजी बनवला. जवळपास १४५ हून अधिक व्यावसायिक निवेदक या ग्रूपचे सदस्य आहेत. सर्वच प्रकारच्या कार्यक्रमासाठी निवेदक इथे अगदी एका मेसेजवर उपलब्ध होतात.
रविवार दिनांक १६ मार्च, २०२५ रोजी कोहिनूर हाॅल, प्रभादेवी येथे या सर्व मंडळीचे स्नेह संमेलन व मार्गदर्शन शिबीर पार पडले. यासाठी मुंबईतील ५० हून अधिक व्यावसायिक निवेदक अगदी वेळात वेळ काढून उपस्थित होते.
सकाळी गणेश पुजन व सरस्वती पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनेक दिवंगत ज्येष्ठ निवेदकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. मग चहापान झाल्यावर ओळख परेड सुरु झाली, ज्यात व्यावसायिक सूत्रसंचालक, गाण्याच्या कार्यक्रमाचा सुसंवादक, क्रिडा समालोचक, राजकीय निवेदक यांचा आपसात छान परिचय झाला. यातले बरेचसे निवेदक नोकरीपेशा आहेत, कुणी मुख्याध्यापक, सल्लागार, वकील, कुणी मोठ्या मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर आहेत तर कुणी व्यावसायिक आहेत. त्यानंतर ज्येष्ठ निवेदक श्री. संदीप कोकीळ यांनी निवेदन क्षेत्रावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. साधकबाधक चर्चा व सोबत प्रश्र्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर भोजन संपन्न झाल्यावर केक कापून आनंद साजरा करण्यात आला. निवेदकांसाठी महाराष्ट्र बाजार पेठ आणि स्वरिता आर्ट्स यांच्या माध्यमातून लकी ड्राॅ काढण्यात आला व विजेत्याना भरघोस बक्षिसे देण्यात आली. गाण्यावर ताल धरत निवेदकांनी आपली नृत्याची हौसही भागवून घेतली आणि मग कार्यक्रमाची सांगता करताना प्रत्येकाने एकमेकांचा सहृदय निरोप घेतला…