प्रतिनिधी (खंडुराज गायकवाड) : – ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदातून मनमुराद हसविले, असे तमाशा सम्राट काळू- बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सोमवारी (ता. १७ मार्च ) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये “रंगबाजी”हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात काळू – बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार आणि निलेशकुमार सहभागी होणार आहेत.
काळू -बाळू म्हटलं तरी मराठी माणसांच्या चेहऱ्यावर सहज हसू उमटतयं, असे हे वाक्य केवळ काळू-बाळू कवलापूरकर यांच्या एका गाजलेल्या वगनाट्याच्या विनोदामुळे प्रचलित झाला आहे. ते वगनाट्य म्हणजे ‘जहरी पेला’, म्हणूनच या जोडगोळीच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सोमवार दिनांक १७ मार्च रोजी “रंगबाजी”हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
कलिना येथील मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या सांस्कृतिक भवनामध्ये (उत्तर द्वार) सदर सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे. प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे, काळू बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार, निलेशकुमार आणि इतर कलाकार या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोककला अकादमी आणि लोकजीवन फाउंडेशन, मुंबई हे सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.
विशेष चर्चा सत्र…!
या दरम्यान तमाशा कला क्षेत्राच्या परंपरेवर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, मराठी नाट्यक्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक संतोष पवार सहभागी होणार आहेत. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका ठक्कर हे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना निशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बिभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केली आहे