प्रतिनिधी
: होळीचा आणि रंगपंचीमीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या मित्र – मैत्रिणींना वेगवेगळ्या प्रकारचे रंग लावण्यासाठी, नातेवाईकांसोबत उत्साहाने धुळवड साजरी करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे रंग दाखल झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या रासायनिक रंगांनी बाजारपेठा नुसत्या फुलून गेल्या आहेत. परंतू रासायनिक किंवा रसायनमिश्रित रंग न वापरता नैसर्गिक रंगाची उधळण करावी अथवा नैसर्गिक रंग वापरावे असे आवाहन पक्षांच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेने नागरिकांना केले आहे .
यंदा होळी इकोफ्रँडली करण्याचा संकल्प सर्वानीच करण्याची गरज आहे . कुठेही लाकडाचे ओंडके जळणार नाहीत . फक्त पालापाचोळा, काटक्या, कचऱ्याची होळी करणार . काळानुरूप आता धर्माचा आयाम बदलण्याची वेळ आली आहे. प्रचंड जंगलतोड केल्यामुळे दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. ऑक्टोबरपासून टँकर चालू होतात. पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर आपण मिळविले काय, याचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे. यापुढे आपण झाडे तोडणार नाही, म्हणजे घरातील फर्निचरही लाकडाऐवजी पर्यायी वस्तूचे घेऊ, निदान एकतरी झाड लावू तसेच त्याला जगवू असा सर्वांनीच विचार करावा; तरच हे दुर्भिक्ष कमी होईल.
धुळवडीच्या दिवशी कृत्रिम रंगाला फाटा देत सर्व नागरिकांनी नैसर्गिक रंगाची उधळण करावी. कारण कृत्रिम रंग आरोग्याला हानिकारक असतात, सोबत ते पर्यावरणालाही घातक असतात. या उलट वनस्पतींच्या पानाफुलांपासून बनवलेले रंग शुद्ध आणि रसायनविरहित असतात. यंदाची धुळवड रसायनमिश्रित रंगाऐवजी हळद, झेंडूची फुले, पळसाची फुले, बेसन, मेंदी, कडुलिंबाचा पाला, मायाळू, कांद्याची साल, पांगारा, बिट यापासून घरच्याघरी नैसर्गिक रंग तयार करून रंगपंचमी साजरी करावी असे आवाहन ‘स्पॅरोज शेल्टर’ चे अध्यक्ष श्री.प्रमोद माने यांनी केली आहे.
आधीच मुंबईला वृक्षतोडीमुळे पर्यावरणाच्या ऱ्हासाला सामोरे जावे लागत आहे. अशातच होळीचा सण साजरा करताना अजून हरीत सृष्टीचा संहार करून ही विविध प्रकारची झाडांची लाकडे जाळून वायूप्रदूषण करता करता वृक्षतोडीला प्रोत्साहन देऊ नये. सण नक्कीच साजरा करावा पण उत्साहाचे रूपांतर विकृतीत होऊ न देता व निसर्गातील प्रत्येक घटकाचा काळजीपूर्वक वापर व संरक्षण कसे करता येईल व पक्ष्यांची कमी होणारी संख्या कशी रोखता येईल व त्यांच्या अन्न साखळीमध्ये आपल्यामुळे काही बाधा तर होत नाही ना हा दृष्टिकोन समाजातील प्रत्येक नागरिकाने जपला पाहिजे व इथून पुढचे प्रत्येक सण इकोफ्रेंडली पद्धतीने साजरे केले पाहिजेत असे मत संस्थेचे अध्यक्ष प्रमोद माने यांनी व्यक्त केला आहे. तसेच कुठेही जखमी पक्षी आढळ्यास अथवा चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी हवी असल्यास ९८६७६३३३५५ या नंबरवर संपर्क करावा.
सदर वृत्त आपण आपल्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध करून उपकृत करावे ही विनंती.
आपला नम्र
प्रमोद माने
(अध्यक्ष)