Thursday, August 28, 2025
घरमहाराष्ट्रजीवनविद्या मिशन तर्फे महिला दिन साजरा ; सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर...

जीवनविद्या मिशन तर्फे महिला दिन साजरा ; सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर वडखळ येथे झाले समाज प्रबोधन

मुंबई (प्रतिनिधी) : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा दिव्य संदेश देणारे सदगुरू श्री. वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनच्या ज्ञानसाधना केंद्र नवी मुंबई २, अंतर्गत स्वानंदयोग साधना केंद्र पेण-अलिबागद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त सुखी जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर वडखळ वासीयांसाठी श्री. गणपती मंदिर देवस्थान व ग्रुप ग्रामपंचायत वडखळ ऑफिसच्या मागील तलावाजवळील भव्य प्रांगणात समाज प्रबोधन घेण्यात आले. तब्बल ३५० ते ४०० ग्रामस्थांनी या प्रबोधनाचा लाभ घेतला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सार्थ हरिपाठाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जीवनविद्या मिशनची सुश्राव्य अशी संगीत जीवनविद्या सादर करण्यात आली. जीवनविद्या मिशनचा सर्वात क्रांतिकारी उपक्रम म्हणजे घरोघरी प्रार्थना जपयज्ञ. हाच उपक्रम २० मिनिटे प्रार्थना जपयज्ञ अतिशय सुश्राव्य व तालबद्ध पद्धतीने कार्यक्रमस्थळी राबविण्यात आला.
जीवनविद्या मिशनमध्ये आल्यानंतर व जीवनविद्येचे विचार आत्मसात केल्यानंतर जीवनामध्ये किती सुखदायक बदल होतात हे सौ. इंद्रायणी भरत लोटणकर यांनी आपल्या सुख संवादातून मांडले. त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रबोधन याला सुरुवात झाली.पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील प्रवचनकार सौ. संगीताताई पाटील, ज्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अध्यापिका म्हणून बरीच वर्षे कार्य करून आज जीवनविद्येच्या वेगवेगळ्या उपक्रमात जसे बाल संस्कार केंद्र, वेगवेगळ्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समुपदेशन यामध्ये अग्रभागी असतात, यांनी आपल्या सुमधुर वाणीने आजच्या समाजातील परिस्थितीला अनुसरून सुयोग्य पद्धतीने मार्गदर्शन करतांना सद्गुरूंच्या विचारांचा चौकार- षटकार लगावला. ‘सुखी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयाला समर्पक असे विषय ज्यात संतती, संपत्ती, संगती, आरोग्य व अति महत्त्वाचे म्हणजे ईश्वर भक्ती या वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी जीवनविद्येचे विचार मांडले वरील पाचही गोष्टींचे आपल्या जीवनामध्ये किती महत्त्व आहे आणि यातील एकही गोष्ट कमी-अधिक असली किंवा नसली तर जीवनामध्ये काय विपरीत परिणाम होऊ शकतात याचा त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने मागोवा घेतला. या विषयांवर बोलत असतांना त्यांनी वेगवेगळ्या उदाहरणांनी जीवनविद्येचे विचार लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. आजच्या जीवनामध्ये लोकांना पडत असलेले प्रश्न ज्यात सासू-सुना संबंध, लहान मुलांचा अभ्यास, प्रेम प्रकरण, मोबाईल व मोबाईलचा स्क्रीन टाईम, कमी वयात होत असलेले डिप्रेशन अशा वेगवेगळ्या विषयांनाही त्यांनी योग्य त्या पद्धतीने हात घातला.
सर्वात विशेष बाब म्हणजे प्रवचनकारांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अगदी खडतर परिस्थितीमध्ये असताना त्यांची जीवनविद्या मिशन सोबत कशी ओळख झाली व जीवनविद्या मिशनच्या विचारांना आत्मसात केल्यावर त्यांच्या जीवनात, संपूर्ण आयुष्यात कसे आमुलाग्र बदल झाले हे त्यांनी सुंदर रित्या मांडले. खरे पाहता अशा समाजप्रबोधनांना लोकांनी उपस्थिती दर्शवणे हे आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या युगात, यूट्यूब, रील्सच्या युगात, डिजे-डिस्कोच्या युगात कमी दिसते. परंतु वडखळवासीयांना अशा कार्यक्रमांची उत्सुकता व आवड आहे हे दिसून आले. कारण सदर कार्यक्रम पूर्ण संपेपर्यंत जाण्याची अजिबात कोणीही घाई न करता ग्रामस्थांनी संपूर्ण कार्यक्रमाचा अगदी मनापासून लाभ घेतला.
स्वानंदयोग साधना केंद्र पेण-अलिबागचे अध्यक्ष श्री संदीप शिरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाची कार्यवाही पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जबाबदारी सौ. शिल्पा ठाकूर यांनी लिलया पार पाडली. कार्यक्रमासाठी श्री. प्रदीप तिळये साहेब, जिल्हा जीवनियाल जज डॉ. ऍड. निता कदम, पेण एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष ऍड. डॉ. मंगेश नेने, वडखळ पोलिस इन्स्पेक्टर प्रसाद पांढरे साहेब, ह. भ. प. कीर्तनकार भिकाजी महाराज, ग्रुप ग्रामपंचायत वडखळ सरपंच सौ. शिवानी विश्वास म्हात्रे, सदस्य श्री. योगेश काशिनाथ पाटील, सदस्य श्री. महेंद्र विठोबा पाटील, सदस्य सौ. विनोदी जनार्धन कोळी, सदस्य सौ. अपूर्वा अंकेत म्हात्रे, सदस्य सौ. नूतन सचिन म्हात्रे, माजी उपसरपंच प्रभाकर नामदेव म्हात्रे, माजी सदस्य धनाजी मंगल नाईक, तसेच माझी उपसरपंच ग्रामपंचायत बोरी श्री. रविंद्र म्हात्रे आणि रायगड भूषण पुरस्कृत श्री. अनिल दरेकर उपस्थित होते. तसेच संपूर्ण कार्यक्रम अगदी व्यवस्थित व्हावा यासाठी स्थानिक नेतृत्व श्री. निलेश म्हात्रे, श्री. प्रमोद म्हात्रे, श्री. शंकर म्हात्रे, सौ. प्रगती म्हात्रे, सौ. संध्या म्हात्रे, सौ. प्रेमल म्हात्रे , सौ. सोनल म्हात्रे, श्रीमती रेवती पाटील व वडखळ ग्रामस्थांनी भरपूर मेहनत घेतली. अशा प्रकारचे कार्यक्रम समाजासाठी नेहमी व्हावेत यासाठी अनेक मान्यवरांनी मागणी केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments