मुंबई (रमेश औताडे) : विद्रोही कवी पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ” चल हल्ला बोल ” या चित्रपटातील मुख्य गाभाच सेन्सॉर बोर्डाने काढण्याचे कारस्थान केले आहे. याचा अर्थ या चित्रपटाला नाकारणे व दलित साहित्याचा घोर अपमान करणे हा आहे. आंबेडकरी जनता हे कदापी सहन करणार नाही. असे सांगत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे म्हणाले, जर या चित्रपटाला सेन्सर बोर्डाने त्वरित मान्यता दिली नाही तर राज्यभर निषेध आंदोलन करण्यात येईल.
नारायण बागडे पुढे म्हणाले, हा चित्रपट प्रदर्शित झाला तर काही प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांना आपल्या भविष्याची चिंता वाढणार आहे. त्यामुळे ते मुग गिळून बसले आहेत. ज्यांच्या एका आवाजावर चड्ड्या पिवळ्या होत होत्या त्याला सेन्सर बोर्ड म्हणतो की, कोण नामदेव ढसाळ ? हा मुर्खपणा कोनाच्या इशारावर केला जात आहे ? असा सवाल बागडे यांनी केला आहे.
नामदेव ढसाळ यांनी गोलपीठा या कविता संग्रहातून दलित साहित्याच्या लेखणीतून शाई नाही रक्त दिले आहे. सेन्सर बोर्डाचे अधिकारी रेवणकर यांना याची माहिती आहे का ? आगीची फुंकर फुंकून अन्याय अत्याचार करणाऱ्यांना वठणीवर त्यांनी आणले होते. असे सांगत बागडे म्हणाले, या सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्याची त्वरित हकालपट्टी करा. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बागडे यांनी सांगितले.