Friday, August 29, 2025
घरमहाराष्ट्रभारतातील पहिल्या रहिमतपूर नगरपालिकेचे नाव बदलण्यास स्थानिकांचा विरोध

भारतातील पहिल्या रहिमतपूर नगरपालिकेचे नाव बदलण्यास स्थानिकांचा विरोध

सातारा(अजित जगताप ) : महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर नगर पालिकेची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी इ.स १८५३ मध्ये झाली. भारतातील पहिल्या क्रंमाकांची नगरपालिका ठरते. आता हिंदुत्ववादी विचारधारेच्या राज्य सरकारमुळे रहिमतपूर सारख्या नावलौकिक प्राप्त शहराचे नाव बदलण्याची भाजप मंत्री यांच्या घोषणेबाजी नंतर रहिमतपूर नाव बदलण्यास प्रचंड विरोध सुरू आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्याला दीर्घ ऐतिहासिक परंपरा रहिमतपूरला खूप मोठा इतिहास आहे. प्रतापगडाच्या रणसंग्रामात सहभागी होण्यासाठी अफझलखानासोबत वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, सय्यद बंडा यांबरोबरच अफजलखानाच्या मदतीसाठी रहिमत खान विजापूर वरून वाईला सैन्यासह पाठवले होते. वाटेत रहिमत खानाने कमंडलू नदीकाठावर काळीशार जमीन पाहून छावणी टाकली. याच छावणीचे पुढे छोट्या रहिमतपूर गावात रूपांतर झाले.
आजही हे गाव रहिमतखानाच्या नावाने ‘रहिमतपूर’ म्हणून ओळखले जाते, तर दुसऱ्या बाजूला ज्यावेळी साधुनी रणदुल्लाखानास दीक्षा दिली त्यावेळी त्याला अत्यानंद झाला आणि रणदुल्ला खान परमेश्वरास उद्देशून म्हणाला, ‘माझ्यावर फार मोठी दया म्हणजे राहमत केली आहे.’ रणदुल्ला खानाने या ठिकाणाला रहिमतपूर म्हणजेच रहिमतपूर नाव दिल्याचा संदर्भ आर. पी. माने यांच्या ‘रहिमतपूर नगरी’ या लेखात आढळतो.

रहिमतपूर बरीच वर्षे विजापूर सरकारच्या अधिपत्याखाली होते. पेशव्यांच्या कारकिर्दीत त्यांची एक टांकसाळ रहिमतपूरला होती. येथे मोहरा, रुपये, चांदीची नाणी व पैसे पाडीत. रहिमतपूर गावाचे असेही काही ऐतिहासिक संदर्भ सापडतात. या रहिमतपूर चे नाव सात समुद्रा पलीकडे पाठवण्याचे काम कवी गिरीश, पद्मश्री वसंत कानेटकर, गो.पू. देशपांडे, डॉ. राजेंद्र शेंडे, गायिका बेला शेंडे, प्राध्यापक नितीन बानगुडे- पाटील, कुस्तीगीर बाबुराव चव्हाण, अण्णा देशपांडे ,स्वातंत्र्य सैनिक सोपानराव घोरपडे, सरदार बाळासाहेब माने आणि अलीकडच्या काळामध्ये गुलाबराव माने , श्रीमती चित्रलेखा माने कदम,सुनील माने ,वासुदेवराव माने , ज्येष्ठ पत्रकार शिवाजी राऊत , भरत शेडगे अशा अनेक रथी महारथी यांच्यामुळे परिचित झाले आहे. त्यांना रहिमतपूर नाव बदलून दुसरे कुठले नाव द्यावं असं कधीही वाटले नाही.
शेक्सपियर यांनी म्हटले नावात काय आहे? पण अलीकडे विकास कामे धोरणात्मक निर्णयापेक्षाही हिंदू मुस्लिम ऐक्याला बाधा येईल. असे कुणीही कृत्य करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची ओळख व्हावी. म्हणून युती सरकारने शिवशाही बस असे नामकरण केले. आज स्वारगेट पुणे येथील एस टी बस मधील प्रकारामुळे सध्या शिवशाही हे नाव गाजत आहे. याची खंत वाटते.
नाव बदलण्यापेक्षा आपली मानसिकता बदलून सर्व धर्म समभावाची शिकवण तेवत ठेवावी. अशी मागणी आता पुढे आलेली आहे. दिनांक २८ मार्च१९९६ रोजी रामनवमीनिमित्त रहिमतपूर चे नाव रघुनाथपूर जाहीर करून गुढी उभारण्याचे आवाहन केले होते. परंतु, त्याला थंड प्रतिसाद मिळाला होता. हा इतिहास ताजा असतानाच महायुतीचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा नामांतराची हाक दिली. पण रहिमतपूर विकासासाठी एक रुपया निधीची घोषणा न केल्यामुळे या नामांतराला आता तीव्र विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, जो इतिहास विसरतो तो कधीच इतिहास घडवू शकत नाही. आज ज्या ज्या ठिकाणी नामांतर झालेले आहे. त्या ठिकाणची सर्वच स्तरावरील परिस्थिती बदलली नाही . याचाही संदर्भ दिला जात आहे. रहिमतपूरची लोकसंख्या पन्नास हजार च्या पुढे असली तरी पाच- पंचवीस लोकांनी केलेली मागणी त्यांच्या दृष्टीने रास्त असली तरी सर्वानुमते ती मागणी नाही. हे मात्र स्पष्ट झाले . अशी प्रतिक्रिया उमटत आहे. तर रहिमतपूर येथील राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला दहा मिनिटांनी प्रतिक्रिया देतो असे सांगितले . व प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments