Monday, April 28, 2025
घरमनोरंजनZapatlela : 'झपाटलेला ३' सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

Zapatlela : ‘झपाटलेला ३’ सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, सिनेमा कधी प्रदर्शित होणार?

Marathi Movie : झपाटलेला सिनेसीरिजमधील तिसरा चित्रपट येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सगळीकडे रंगली होती. महेश कोठारे यांनी राजश्री मराठी या चॅनेलला या संदर्भात मुलाखत दिली. त्यामुळे झपाटलेला सिनेमाच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर ‘झपाटलेला ३’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. अभिनेता आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत झपाटलेला ३ सिनेमा येणार असल्याची बातमी स्पष्ट केली.

या सिनेमाच्या पोस्टरवर अर्धा चेहरा तात्या विंचूचा आणि अर्धा चेहरा आदित्यचा दिसून येतोय. त्यामुळे यावेळी तात्या आदित्यच्या शरीरात प्रवेश मिळवण्यात यशस्वी होईल का? असा प्रश्न सगळ्यांना पडलाय. पोस्टरवर ‘मी तात्या विंचू…’ असं कॅप्शन देण्यात आल्यामुळे यावेळी झपाटलेला ३मध्ये काहीतरी थरारक आणि तितकंच हटके कथानक पाहायला मिळणार असा अंदाज पोस्टरवरून येतोय. आदिनाथने या पोस्टरला “Yes it’s true !!! हो खरंय !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! २०२५ चित्रपटगृहात ! 2025 in the theatres ! ओम फट स्वाहा !!!” असं कॅप्शन दिल आहे.

त्याच्या या पोस्टरवर अनेकांनी कमेंट करत ते या सिनेमासाठी उत्सुक असल्याचं म्हंटलं आहे. एका युजरने “2013 पासून वाट पाहतोय … 12 वर्षानी परत येणार” अशी कमेंट केली आहे तर एकाने “मी जरूर पाहील हा चित्रपट. पण ह्या मधे दोन जनाची खुप आठवण येईल ती म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय चव्हाण.” असं म्हणत या सिनेमातील दिवंगत कलाकार लक्ष्मीकांत आणि विजय चव्हाण यांची आठवण काढली. तर आदिनाथच्या सिनेविश्वातील मित्रांनीसुद्धा या पोस्टवर कमेंट करत त्याला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला ३ सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती. “झपाटलेला चित्रपटाच्या फ्रँचायझीमधील दोन सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर त्याच ताकदीचा किंबहुना त्याहून अधिक ताकदीचा पुढील चित्रपट देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.” असं ते या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

झपाटलेला २ मध्ये तात्या विंचू पुन्हा बाहुल्याच्या रूपात जिवंत झाला होता आणि मानवी शरीर मिळवण्यासाठी तो लक्ष्याचा मुलगा आदित्यचा शोध घेत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. या सिनेमात आदिनाथने आदित्यची भूमिका साकारली होती आणि आता पुन्हा तिसऱ्या भागातही आदिनाथ याच भूमिकेत दिसणार आहे. झपाटलेला २ मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसुद्धा होती पण तिसऱ्या भागात ती काम करणार कि नाही हे अजून स्पष्ट झालं नाहीये. २०२५ या नवीन वर्षात झपाटलेला ३ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments