Monday, September 1, 2025
घरमहाराष्ट्रडॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बिनचूक निर्मितीसाठी नव्या शिल्पकाराचा शोध घेण्यात यावा :...

डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बिनचूक निर्मितीसाठी नव्या शिल्पकाराचा शोध घेण्यात यावा : इंदू मिल स्मारक दक्षता समितीची मागणी

मुंबई: चैत्यभूमीनजीकच्या इंदू मिलमधील आंतराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ४५० फूट उंचीच्या नियोजित उत्तुंग पुतळ्याची नमुना प्रतिकृती सदोष असल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे डॉ.आंबेडकर यांच्या बिनचूक आणि निर्दोष पुतळ्याच्या निर्मिती शोध घेण्यात यावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दक्षता समितीने केली आहे. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

समितीच्या मुंबईत झालेल्या एका बैठकीत नव्या शिल्पकाराचा शोध घेण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे. शिल्पकार अनिल राम सुतार यांनी बनवलेल्या २५ फूट उंचीच्या नमुना पुतळ्या वर शिल्पकला आणि चित्रकलेतील जाणकार आक्षेप नोंदवू लागले आहेत. त्यांचे पुतळ्यावरील अभिप्राय प्रतिकूल आहेत, असे या बैठकीतून समोर आले आहे.

या बैठकीला बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने, दलित पँथरचे नेते सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, ओबीसींचे नेते राजाराम पाटील,समाजवादी पार्टीचे महासचिव राहुल गायकवाड, काँग्रेस नेते गणेश कांबळे, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रवी गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तमराव गायकवाड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोम्रेड सुबोध मोरे, सतीश डोंगरे, रिपाइंचे सो. ना. कांबळे, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष मिलिंद सुर्वे, ॲड प्रफुल्ल सरवदे, प्रसेनजित कांबळे, ॲड. जयमंगल धनराज, गौतम कांबळे, आबा मुळीक, मिथुन कांबळे बापूराव गायकवाड यांचा समावेश होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीत सहभाग असलेले नवी मुंबईतील शिल्पकार शिवाजी परुळेकर यांनी इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यातील दोष बैठकीत मांडले आहेत.

१. उजवा हात उंचावल्यानंतर कोटाचा तो भाग काही प्रमाणात उचलला गेल्याचे दाखवणे क्रमप्राप्त होते. सदोष पुतळ्यात तसे दिसत नाही.

२. पुतळ्याचा कोट बॉडी हगिंग म्हणजे घट्ट दाखवण्यात आला आहे. डॉ. आंबेडकर यांचे कोट सैल असत. त्यामुळे कोटावर फोल्ड असणे आवश्यक होते.

३. कोटाची बटणे उघडल्यावर कोट पँटच्या लेव्हलच्या बाहेर यायला हवा. तसा तो दिसत नाही.

४. कोटाचे खिसे चुकीच्या पद्धतीने बरेच खाली दाखवले आहेत. जे दुसऱ्या बटणाच्या रेषेत यायला हवे होते.

५. पुतळ्यात पुस्तक पकडण्याची पद्धत चुकलेली आहे. त्यात सौंदर्याचा अभाव आहे.

६. पँटवर अनावश्यक आणि चुकीचे फोल्ड दाखवले आहेत.

७. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पँट पोटावर असायची. इथे ती बरीच खाली दिसते.

८ . बूट हे शेप लेस म्हणजे आकारहीन झाले आहेत.

९. उजव्या हाताचा अंगठा गरजेपेक्षा अधिक बाहेर आलेला आहे.

१०. डॉ. आंबेडकर यांचा चेहरा हा उभट झाला असून त्यांच्या प्रत्यक्षातील चेहऱ्याशी तो विसंगत आहे.

११. दोन पायातील अंतर अधिक झाले आहे.

१२. बाबासाहेबांच्या शरीराच्या पुढील भागाचा विचार न केल्यामुळे पुतळा सपाट वाटतो.

१३. एकंदरीतच पुतळ्यामध्ये डॉ. आंबेडकर यांचा चेहरा आणि व्यक्तिमत्व कुठेच दिसत नाही.

*निर्मितीसाठी नव्या शिल्पकाराचा शोध घेण्यात यावा*

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments